गरजू आदिवासी बांधवांसाठी ‘सोशल बार्बर’चा मदतीचा हात; म्हस्कळ-कोणीवाड्यात अन्नधान्य वाटप

टिटवाळा : अजय शेलार 

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपत स्वामी सोशल बार्बर फाउंडेशनच्या वतीने टिटवाळ्याजवळील म्हस्कळ कोणीवाडा येथील गरजू आदिवासी कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्याची परंपरा जपणाऱ्या फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे गरजू आदिवासी भगिनी आणि कुटुंबांना मोठा आधार मिळाला.

या उपक्रमाला फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र बिरारी, सचिव पूनम बिरारी तसेच सहकारी संजय बागड आणि ओम बिरारी उपस्थित होते. स्वामी सोशल बार्बर फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम संस्थात्मक पातळीवर राबविण्यात येत आहे. मात्र, संस्थेची स्थापना होण्यापूर्वीपासूनच रवींद्र बिरारी हे वैयक्तिक पातळीवर गरजू आदिवासी कुटुंबांना मदत करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गेल्या ९ ते १० वर्षांपासून विविध माध्यमातून गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करण्याचे काम सातत्याने सुरू आहे.

टिटवाळ्यातील रहिवासी असलेले रवींद्र बिरारी हे त्यांच्या आगळ्यावेगळ्या सामाजिक कार्यामुळे ‘सोशल बार्बर’ म्हणून ओळखले जातात. व्यवसायाने केशकर्तनकार असलेले बिरारी आपल्या व्यवसायाच्या वेळेपेक्षा वेगळ्या वेळेत, विशेषतः सुट्टीच्या दिवशी, विविध रेल्वे स्थानक परिसर तसेच आजूबाजूच्या भागात फिरणारे गरजू, भिकारी आणि बेवारस अवस्थेत असलेल्या व्यक्तींचे मोफत केस कापून देतात. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता अनेक वर्षांपासून सुरू असलेली त्यांची ही सेवा समाजासाठी माणुसकीचा वेगळा आदर्श निर्माण करणारी ठरली आहे.

रस्त्यावर, रेल्वे स्थानक परिसरात किंवा सार्वजनिक ठिकाणी दुर्लक्षित अवस्थेत जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा स्वच्छता आणि आत्मविश्वासाचे हास्य आणण्याचा प्रयत्न बिरारी यांच्या माध्यमातून केला जातो. त्यांच्या या अनोख्या सामाजिक कार्याची विविध स्तरांवर दखल घेण्यात आली असून सामाजिक क्षेत्रासह चित्रपटसृष्टी आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

केवळ मोफत केशकर्तनाची सेवा न देता गरजू व्यक्ती आणि कुटुंबांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न रवींद्र बिरारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून केला जात आहे. त्याच सामाजिक बांधिलकीतून यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त म्हस्कळ कोणीवाडा येथील आदिवासी कुटुंबांसाठी अन्नधान्य वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला.

स्वातंत्र्याला अनेक दशके उलटून गेल्यानंतरही समाजातील काही घटक मूलभूत गरजांसाठी संघर्ष करत आहेत. अशा वेळी शासनाच्या योजनांसोबतच समाजातील सक्षम व्यक्ती आणि संस्थांनीही पुढे येऊन गरजूंच्या जीवनात आधार देणे गरजेचे आहे. रवींद्र बिरारी आणि स्वामी सोशल बार्बर फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले हे कार्य त्याच सामाजिक जाणीवेचे उदाहरण ठरत आहे.

‘सेवा हीच खरी माणुसकी’ या भावनेतून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे म्हस्कळ कोणीवाड्यातील गरजू आदिवासी कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. सामाजिक कार्याची ही वेगळी वाट भविष्यातही अशीच सुरू ठेवण्याचा निर्धार फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *