बातमीचा परिणाम! काही तासांतच चौकातील तिरंगे हटवले

राष्ट्रध्वजाच्या योग्य व्यवस्थापनाचा मुद्दा उपस्थित होताच तातडीने दखल; टिटवाळ्यातील वृत्ताची चर्चा

टिटवाळा : अजय शेलार

स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा बाईक रॅलीनंतर चौकातील रेलिंग आणि परिसरात लावण्यात आलेले राष्ट्रध्वज तीन दिवसांनंतरही कायम असल्याचा मुद्दा जनताहित फाउंडेशनचे  संस्थापक अध्यक्ष रितेश कांबळे यांनी  वृत्तातून समोर आल्यानंतर संबंधितांनी तातडीने दखल घेतली. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच चौकातील तिरंगे सन्मानपूर्वक हटविण्यात आले. त्यामुळे एका वृत्तातून उपस्थित झालेल्या रास्त प्रश्नाची त्वरित दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

१५ ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त टिटवाळ्यात तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली होती. रॅलीच्या निमित्ताने चौकातील रेलिंग आणि परिसरात तिरंग्यांची सजावट करण्यात आली होती. कार्यक्रम उत्साहात पार पडला, मात्र 19  ऑगस्टच्या दुपारपर्यंत हे तिरंगे त्याच ठिकाणी कायम असल्याचे निदर्शनास आले. राष्ट्रध्वजाचा सन्मान हा केवळ उत्सवापुरता मर्यादित नसून कार्यक्रमानंतर त्याची योग्य व्यवस्था आणि जतन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचा मुद्दा वृत्तातून मांडण्यात आला होता.

या वृत्तानंतर काही तासांतच संबंधितांनी चौकातील तिरंगे हटवून परिसर पूर्ववत केला. आधी तिरंग्यांनी सजलेले रेलिंग आणि चौक आता रिकामे दिसत असून राष्ट्रध्वजाच्या व्यवस्थापनाबाबत तातडीने पावले उचलण्यात आल्याचे छायाचित्रांतून स्पष्ट होत आहे.

लोकहिताशी संबंधित प्रश्न मांडणे हे पत्रकारितेचे महत्त्वाचे काम असते. एखादी त्रुटी निदर्शनास आणून देताना त्यामागे कोणाला लक्ष्य करण्यापेक्षा संबंधित बाबीकडे लक्ष वेधणे हा उद्देश असतो. टिटवाळ्यातील या प्रकरणातही वृत्तातून उपस्थित करण्यात आलेला मुद्दा नेमका हाच होता की, स्वातंत्र्यदिनाचा उत्सव संपल्यानंतर राष्ट्रध्वजाची पुढील व्यवस्था तितक्याच जबाबदारीने केली जात आहे का? या प्रश्नाची दखल घेत काही तासांतच तिरंगे हटविण्यात आल्याने वृत्ताचा परिणाम दिसून आला.

देशभक्तीचा उत्सव साजरा करणे महत्त्वाचेच, मात्र राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी कार्यक्रमानंतरची जबाबदारीही तितकीच आवश्यक असते. याचीच जाणीव करून देणाऱ्या वृत्तानंतर झालेल्या तातडीच्या कार्यवाहीमुळे आता हा चौक पुन्हा पूर्ववत झाला आहे. प्रश्न उपस्थित झाला, त्याची दखल घेण्यात आली आणि काही तासांतच आवश्यक पाऊल उचलण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *