मार्क्सवादी चळवळीतील लढवय्या योद्धा – कॉ. लहानू कोम यांचे निधन

Whatsapp image 2025 05 28 at 11.54.58 am

निलेश कासट : पालघर

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार, माजी आमदार, आदिवासी चळवळीचे आधारस्तंभ आणि आदिवासी प्रगती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड लहानू शिडवा कोम यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. वयाच्या ८६व्या वर्षी त्यांनी तलासरीतील एका खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने अखेरचा श्वास घेतला. गेले दहा दिवस ते आय.सी.यू.मध्ये उपचार घेत होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण डाव्या चळवळीवर आणि विशेषतः ठाणे-पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजावर शोककळा पसरली आहे. मार्क्सवादी चळवळीचे ते १९५९ पासूनचे सक्रिय कार्यकर्ते होते. पक्षाच्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य, अखिल भारतीय किसान सभेचे माजी राज्य उपाध्यक्ष, तसेच लोकसभा व विधानसभा या दोन्ही सभागृहांचे प्रतिनिधित्व त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केले. श्रमिक, शेतकरी व विशेषतः आदिवासी जनतेसाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला.

शिक्षण आणि समाजकार्याचा पाया

१९६२ साली स्थापन झालेल्या ‘आदिवासी प्रगती मंडळ’ या संस्थेच्या ते संस्थापक अध्यक्ष होते. गेली सहा दशके त्यांनी हजारो आदिवासी मुलामुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे अविरत कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली तलासरी, धाणू, जव्हार, विक्रमगड परिसरात शाळा, वसतीगृहे, वाचनालये, प्रशिक्षण केंद्रे उभी राहिली. शिक्षण ही समाजक्रांतीची पहिली पायरी असल्याची त्यांची ठाम धारणा होती. लोकसभा व विधानसभा सदस्य म्हणून काम करताना त्यांनी नेहमीच गरीब, वंचित, शोषित समाजासाठी आवाज उठवला. त्यांच्या कार्यकाळात भूमिहीन शेतकऱ्यांचे प्रश्न, वनहक्क, रोजगार हमी, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि शिक्षण यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी लोकसभा आणि विधानसभा पातळीवर ठाम भूमिका घेतली. ते पक्षाचे शिस्तप्रिय, विचारनिष्ठ आणि अत्यंत साध्या जीवनशैलीचे नेते म्हणून ओळखले जात. वयाच्या ८६व्या वर्षापर्यंतही ते तलासरीतील जनआंदोलनांमध्ये सक्रिय होते.त्यांच्या पश्चात पत्नी हेमलता, मुलगा सुबोध, सून सुजाता, कन्या सुनंदा, जावई हरिश्चंद्र खुलात आणि नातवंड विजय, तुषार, रुचिता असा परिवार आहे. कॉम्रेड लहानू कोम यांची अंत्ययात्रा गुरुवार, दिनांक २९ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता, तलासरी येथील ‘कॉ. गोदावरी परुळेकर भवन’ (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कार्यालय) येथून निघेल. या अंत्ययात्रेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील नेते, विविध सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, आणि ठाणे-पालघर जिल्ह्यातील हजारो माकप कार्यकर्ते सहभागी होतील.

कॉ. लहानू कोम यांना क्रांतिकारी लाल सलाम!
त्यांचे जीवनकार्य आणि मूल्यनिष्ठ संघर्ष हीच खरी श्रद्धांजली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *