बातमीचा इफेक्ट; सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसमोरील अडथळा दूर, पोलिसांच्या सूचनेनंतर बॅनर हटविण्यात आले
टिटवाळा : अजय शेलार
नवरात्रोत्सव मंडळांच्या बॅनरमुळे टिटवाळ्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे दृश्य झाकले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत ‘टिटवाळ्यात नवरात्रोत्सवाच्या बॅनरनी झाकला पोलिसांचा तिसरा डोळा’ या वृत्तातून पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या बातमीचा इफेक्ट दिसून आला असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसमोरील अडथळा दूर करण्यात आल्याचे छायाचित्रांवरून स्पष्ट होत आहे.
टिटवाळ्यात नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरमुळे महत्त्वाच्या ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दृश्यात अडथळा निर्माण झाला होता. गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवणे, वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवणे तसेच चोरी, वाहनचोरी आणि इतर अनुचित प्रकार घडल्यास संबंधित घटनांचे चित्रण मिळविण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा महत्त्वाची ठरते. मात्र, कॅमेऱ्यांसमोरच बॅनर लावले गेल्यास या यंत्रणेचा अपेक्षित उपयोग कसा होणार, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.
या समस्येकडे बातमीच्या माध्यमातून लक्ष वेधल्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार संबंधित बॅनर हटविण्यात आल्याचे उपलब्ध छायाचित्रांमधून दिसून येते. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या दृश्यात निर्माण झालेला अडथळा दूर करण्याच्या दृष्टीने कार्यवाही झाल्याचे चित्र आहे.
सण-उत्सवांच्या काळात शहरात गर्दी वाढते. अशा वेळी सार्वजनिक ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे उत्सवाचे बॅनर, स्वागत कमानी किंवा जाहिरात फलक लावताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे दृश्य झाकले जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा, एखादी अनुचित घटना घडल्यानंतर तिचे चित्रण मिळविण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
बातमीचा परिणाम, नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित प्रश्न बातमीच्या माध्यमातून मांडल्यानंतर त्यावर कार्यवाही झाल्याचे चित्र समोर आले आहे. उत्सवाचा उत्साह कायम ठेवतानाच शहराच्या सुरक्षेशी तडजोड होणार नाही, याची जबाबदारी संबंधित मंडळे आणि यंत्रणांनी घेणे गरजेचे आहे. टिटवाळ्यातील या प्रकारातून सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसमोरील मोकळे दृश्य कायम ठेवण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.












Leave a Reply