भटक्या कुत्र्यांचे रेबीजपासून संरक्षणासाठी मोफत लसीकरण; मांडा-टिटवाळ्यात प्रिया गरूडेंचा स्तुत्य उपक्रम

टिटवाळा, प्रतिनिधी : भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये निर्माण होणाऱ्या रेबीजच्या धोक्याला आळा घालण्याबरोबरच मुक्या प्राण्यांचे आरोग्य जपण्यासाठी मांडा-टिटवाळा परिसरात भटक्या कुत्र्यांचे मोफत रेबीज लसीकरण करण्यात आले.  सावरकर नगर, श्री क्षेत्र मांडा, टिटवाळा  येथे  हा उपक्रम राबविण्यात आला.

प्रिया गरुडे या  भटक्या कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या या संस्थेशी संलग्न असून त्या नियमितपणे या प्रण्यंची काळजी घेण्याचे  काम करतात. तसेच त्या प्राणी कल्याणाशी संबंधित सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असून, मेनका गांधी यांच्या पीपल फॉर ॲनिमल्स’ (People for Animals – PFA) संस्थेशी संबंधित आहेत. भटक्या कुत्र्यांची केवळ खाद्याची गरज भागविण्याऐवजी त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जावी, या उद्देशाने त्यांनी रेबीज लसीकरणाचा हा उपक्रम पुढाकार घेऊन आयोजित केला.

या लसीकरण मोहिमेसाठी डोंबिवली येथील पशुवैद्यकीय डॉक्टर श्री. निलेश भणगे तसेच त्यांचे सहकारी राज बिंद्रा आणि पाटील मॅडम यांनी सहकार्य केले. त्यांच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले. विशेष म्हणजे हा संपूर्ण उपक्रम निःशुल्क राबविण्यात आला.

भटक्या कुत्र्यांचे लसीकरण झाल्यामुळे त्यांच्या आरोग्याचे संरक्षण होण्यासोबतच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे. प्राण्यांबद्दल संवेदनशीलता जपत त्यांची निगा, उपचार आणि लसीकरण याकडेही समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज या उपक्रमातून अधोरेखित झाली आहे.

मुक्या प्राण्यांची सेवा ही केवळ दयाभावाची बाब नसून सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक जबाबदारीचाही एक भाग आहे. त्यामुळे मांडा-टिटवाळा परिसरात राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *