टिटवाळा, प्रतिनिधी :कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात असलेल्या रायते गाव, परिसरातील तरुण शिक्षक आणि कवी अनिल सुरोशी यांच्या ‘स्वप्नपक्षी आणि इतर कविता’ या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी व गीतकार अरुण म्हात्रे यांच्या हस्ते शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी ठाण्यातील वागळे इस्टेट येथील कशिश पार्कमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वास्तूत उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ठाणे जिल्हाध्यक्ष संध्या लगट यांनी काव्यसंग्रहाचे कौतुक करत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी ‘घायाळ’ ही गझल आपल्या अनोख्या शैलीत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. गीता पांगारे यांनीही पुस्तक प्रकाशनाबद्दल आनंद व्यक्त केला. अशा साहित्यिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची आणि त्यासाठी लोकसहभाग वाढवण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
प्रकाशन सोहळ्यात अरुण म्हात्रे यांनी ग्रामीण भागातून पुढे येत असलेल्या कवी अनिल सुरोशी यांचे अभिनंदन केले. कविता क्षेत्रात आणखी मोठी वाटचाल करण्याची संधी असून कवीने नेहमी सजग राहून कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यास तयार असले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अनिल सुरोशी यांचा साधेपणा आपल्याला भावल्याचे सांगतानाच त्यांच्या कविता निश्चितच वाचकांपर्यंत पोहोचतील आणि लोकप्रिय होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अखेरीस अरुण म्हात्रे यांनी ‘एक होते गाव’ ही कविता आपल्या सदाबहार शैलीत सादर केली. गावाच्या बदलत्या स्वरूपाचे चित्र उभे करणाऱ्या या कवितेने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरेल सांगता झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी आणि सुरेल निवेदन सुसंवादिका व कवयित्री मनीषा चव्हाण यांनी केले.
तरुण कवीच्या दुसऱ्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने साहित्यप्रेमींना कवितेचा आनंद घेण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातून साहित्य क्षेत्रात आपली ओळख निर्माण करू पाहणाऱ्या अनिल सुरोशी यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी या सोहळ्याने प्रोत्साहन दिले.













Leave a Reply