शिवसेना युवा नेते शिवाजी किसनराव शिराळे पाटील यांचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
KYC, आधार प्रमाणीकरण व AgriStack प्रक्रियेतील अडथळे दूर करण्याची मागणी
बुलढाणा , चिखली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या मयत शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमुक्तीचा लाभ तातडीने मिळावा, अशी मागणी युवा नेते शिवाजी किसनराव शिराळे पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी चिखली तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले. शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, मयत शेतकऱ्यांच्या वारसांची अनेक प्रकरणे KYC, आधार प्रमाणीकरण, AgriStack नोंदणी तसेच आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी किंवा प्रक्रियेमुळे प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित वारसांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्रपणे या प्रकरणांचा निपटारा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
मयत शेतकऱ्यांच्या वारसांची KYC प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, वारसांसाठी आधार प्रमाणीकरण व AgriStack नोंदणीची प्रक्रिया सुलभ करावी, तसेच त्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याशिवाय वारसांकडून आवश्यक कागदपत्रे एकाच वेळी स्वीकारावीत आणि त्यांना वारंवार बँकेत बोलावू नये. वारस प्रमाणपत्र, आधार, पॅनकार्ड व इतर आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित प्रकरणाची सद्यस्थिती आणि पुढील कार्यवाहीची माहिती वारसांना देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
चिखली तालुक्यातील या प्रकारची सर्व प्रकरणे गावनिहाय आणि बँकनिहाय संकलित करून प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा. संबंधित बँकांना वरिष्ठ स्तरावरून आवश्यक निर्देश देऊन पात्र वारसांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ज्या वारसांची कागदपत्रे पूर्ण आहेत, अशा प्रकरणांना प्राधान्य देऊन त्यांच्या खात्यावर कर्जमुक्तीचा लाभ तातडीने वर्ग करावा. कागदपत्रांमध्ये किरकोळ त्रुटी किंवा उणीव असल्यास ती लेखी स्वरूपात संबंधित वारसांना कळवून दुरुस्तीची संधी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
तहसील कार्यालय आणि सहकार विभागाच्या माध्यमातून विशेष मदत कक्ष किंवा संपर्क अधिकारी उपलब्ध करून वारसांना आवश्यक मार्गदर्शन करावे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेऊन प्रलंबित प्रकरणांचा कालबद्ध पद्धतीने निपटारा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मयत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी KYC, आधार प्रमाणीकरण, AgriStack नोंदणी आणि बँक स्तरावरील आवश्यक कार्यवाही जलदगतीने पूर्ण होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र वारसांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी शिवाजी किसनराव शिराळे पाटील यांनी केली आहे.
निवेदन सादर करताना शिवाजी किसनराव शिराळे पाटील, मनोज लाहोरकर, शिवसेना नेते अनिल भाऊ जाधव, उपतालुकाप्रमुख राजेंद्र लहाने, रवींद्र काकडे, अमरदादा सुसर, उपशहर प्रमुख विनोद भाऊ वानरे, अमर काळे, अभिजीत वीर, योगेश गवळी, अनिल खरात, संघर्ष तरकसे, राजूभाऊ साळवे, सचिन गवई, देवानंद वतारी, ठेग भाऊ, शुभम जाधव आदी उपस्थित होते.













Leave a Reply