विवाहितेवरील सामूहिक अत्याचार प्रकरण चिघळले; काँग्रेसची ४८ तासांत अटकेची मागणी

कल्याण : रोशन उबाळे 

भिवंडी तालुक्यातील पडघा येथे विवाहितेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. आरोपींना तातडीने अटक करावी, तसेच पीडितेला आवश्यक पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी करत केडीएमसीच्या काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन्ही आरोपींना पुढील ४८ तासांत अटक न झाल्यास पडघा पोलीस ठाण्यासमोर महिला आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत कांचन कुलकर्णी यांनी आरोपींच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करत तपास यंत्रणेकडून तातडीने कारवाई होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यातील एक आरोपी माजी आमदार असल्याने आणि दुसऱ्या आरोपीविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचा दावा करण्यात आल्याने पीडितेवर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ नये, यासाठी तिला पोलीस संरक्षण देण्याची गरज असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत कांचन कुलकर्णी यांनी आणखी गंभीर दावे केले आहेत. बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील याच्याकडून अत्याचार झाल्याचा दावा करणाऱ्या आणखी १५ महिला, तर नरेंद्र पवार यांच्याविरोधात अत्याचाराचे आरोप करणाऱ्या तीन महिला आपल्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. या महिला लवकरच पुढे येऊन संबंधित प्रकरणांमध्ये तक्रारी दाखल करतील, असा दावाही कुलकर्णी यांनी केला. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसून संबंधित महिलांच्या तक्रारी आणि त्यानंतरची कायदेशीर प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

शैलेश पाटील बडतर्फ झाल्यानंतरही त्याच्याकडील रिव्हॉल्वर जप्त करण्यात आला नसल्याचा सवालही कांचन कुलकर्णी यांनी उपस्थित केला. उच्च न्यायालयाने २०२२ मध्येच या शस्त्राच्या जप्तीचे आदेश दिले होते, असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे संबंधित शस्त्राबाबत प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने नेमकी कोणती कारवाई केली, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

पडघा येथील विवाहितेवरील कथित सामूहिक अत्याचाराचे प्रकरण गंभीर असल्याने तपास निष्पक्षपणे आणि कोणत्याही दबावाशिवाय झाला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. पीडितेच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याबरोबरच गुन्ह्यातील आरोपींवर कायद्यानुसार तातडीने कारवाई करावी, अशी भूमिका कुलकर्णी यांनी मांडली.

दरम्यान, ४८ तासांच्या आत आरोपींना अटक झाली नाही तर पडघा पोलीस ठाण्यासमोर महिला आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा कांचन कुलकर्णी यांनी दिल्याने या प्रकरणावरून आगामी काळात राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. आता पोलीस या प्रकरणात कोणती कारवाई करतात आणि तपासातून पुढे कोणती तथ्ये समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *