टिटवाळ्यात जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य रॅली; पारंपरिक वेशभूषेत आदिवासी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

आदिवासी संस्कृतीचा जल्लोष; रॅलीतून एकता, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश

टिटवाळा : जागतिक आदिवासी दिनानिमित्त मांडा-टिटवाळा परिसरात आदिवासी सामाजिक फाऊंडेशनच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष तथा माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या रॅलीत मांडा, टिटवाळा पूर्व-पश्चिम परिसरातील आदिवासी बांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मांडा पश्चिम येथून सुरू झालेली ही रॅली टिटवाळा पूर्वेकडील गणेश मंदिर परिसरापर्यंत काढण्यात आली. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा, दागिने आणि आकर्षक सजावटीतून आपल्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवले. महिला, पुरुष तसेच युवक-युवतींच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे संपूर्ण परिसरात आदिवासी संस्कृतीचा जल्लोष आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.

चौकात पारंपरिक संस्कृतीचे आकर्षक सादरीकरण

रॅलीदरम्यान एका ठिकाणी थांबून सहभागी तसेच परिसरातील नागरिकांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमामुळे समाजातील आपुलकी आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
रॅली पुढे सरकत असताना काही ठिकाणी थांबून आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने प्रतिसाद दिला.

रॅलीसोबत स्वच्छतेचा संदेशस्वयंसेवकांचा पुढाकार

या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रॅलीसोबत स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. आदिवासी सामाजिक फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील कचरा गोळा करून साफसफाई केली. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, हा महत्त्वपूर्ण सामाजिक संदेश या माध्यमातून देण्यात आला.

रॅलीनंतर महागणपती मंदिराच्या मागील बाजूस धर्मशाळेजवळील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, हक्क आणि सामाजिक एकतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मान्यवरांनी समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस प्रभारी अधिकारी मुकेश ढगे तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर स्थानिक नगरसेविका माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, नगरसेवक बंदेश जाधव, केडीएमसी अ प्रभाग शहर पथविक्रेता समिती सदस्य आरती पोटावे, भाजप टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, सामाजिक कार्यकर्ते अश्फाक मांडेकर यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या. रॅलीदरम्यान कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पोलिसांनी योग्य ती व्यवस्था केली होती.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित या रॅलीतून आदिवासी समाजाची समृद्ध परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकतेचे प्रभावी दर्शन घडले. पारंपरिक वेशभूषा, स्वच्छतेचा संदेश आणि नागरिकांसाठी केलेले उपक्रम यामुळे ही रॅली केवळ उत्सव न राहता सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *