महापौर हतबल…दौरा अर्धवट सोडून माघारी…?

फोनवरून सुनावल्यानंतरही अधिकारी गैरहजर

कल्याण, प्रतिनिधी : मान्सूनपूर्व नाला सफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या केडीएमसीच्या महापौर हर्षाली चौधरी (थविल) यांना अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईचा सामना करावा लागला. पूर्वसूचना देऊनही संबंधित प्रभाग अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी अनुपस्थित असल्याने संतप्त झालेल्या महापौरांनी पाहणी दौरा अर्धवट सोडून माघारी फिरण्याचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा आहे .

महापौरांनी कल्याण पूर्वेतील द्वारली आणि नांदिवली परिसरातील नाला सफाईच्या कामांची पाहणी आयोजित केली होती. नियमानुसार संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांची उपस्थिती आवश्यक असतानाही प्रभाग अधिकारी सुनील लोंढे व इतर कर्मचारी घटनास्थळी हजर नव्हते. यामुळे महापौरांनी जागेवरूनच अधिकाऱ्यांना दूरध्वनीवर संपर्क साधून जाब विचारला.

“मी येणार आहे हे माहीत असूनही तुम्ही आधी का पोहोचला नाहीत? सकाळी नऊ-दहा वाजताच येथे उपस्थित असायला हवे होते,” अशा शब्दांत महापौरांनी नाराजी व्यक्त केली. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. “तुम्ही कार्यालयात बसण्यासाठी आहात की लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी?” असा सवालही त्यांनी केला. त्यावर अधिकाऱ्याने टोलवाटोलवीची भूमिका घेतल्याने महापौरांचा संताप आणखी वाढला.

“तुमचे प्रभागाकडे लक्षच नाही. फक्त खुर्चीवर बसून राहता,” असे म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांच्या हलगर्जी कारभारावर ताशेरे ओढले. विशेष म्हणजे फोनवरून सुनावल्यानंतरही संबंधित अधिकारी घटनास्थळी पोहोचले नाहीत. त्यामुळे महापौरांनी उपस्थित नागरिकांना “अधिकारी आता येणार नाही,” असे सांगितले.

या प्रकारामुळे उपस्थित नागरिकांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले. “अधिकारी तुमचेच ऐकत नाहीत, तर आमचे कोण ऐकणार?” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून शहरात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

या घटनेमुळे केडीएमसीतील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, लोकप्रतिनिधींच्या सूचनांनाही अधिकारी कितपत गांभीर्याने घेतात, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *