टिटवाळा, प्रतिनिधी : रितेश कांबळे
टिटवाळा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत कॅश व्यवहारांसाठी फक्त एकच काऊंटर सुरू असल्याने ग्राहकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असून, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे. महिन्याच्या सुरुवातीला पेन्शनधारकांची गर्दी वाढल्याने बँकेबाहेर आणि आत लांबलचक रांगा लागतात.
ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, पेन्शन काढण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक शाखेत येतात. मात्र उपलब्ध कॅश काऊंटर एकच असल्याने व्यवहार पूर्ण करण्यासाठी अनेकांना एक ते दोन तासांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. वृद्धापकाळामुळे जास्त वेळ उभे राहणे कठीण असतानाही अनेक ज्येष्ठ नागरिकांना रांगेत थांबावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
काही ग्राहकांनी शाखेत बसण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याची तक्रारही केली. गर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग व्यक्तींना विशेष अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र काऊंटर किंवा प्राधान्य सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे.
याबाबत शाखा प्रशासनाशी संपर्क साधला असता, कर्मचारी कमतरतेमुळे अतिरिक्त कॅश काऊंटर सुरू करण्यात अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले. ग्राहकांनी शक्यतो एटीएम व डिजिटल व्यवहारांचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल व्यवहारांची सवय नसल्याने त्यांच्यासाठी काऊंटरवरील सेवा अत्यावश्यक असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्यास शाखेत उकाड्याची समस्या निर्माण होत असल्याची तक्रारही समोर आली आहे. जनरेटरची सुविधा असली तरी ती मर्यादित स्वरूपात वापरली जात असल्याने गर्दीच्या काळात ग्राहकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो. यामुळे विशेषतः वृद्ध आणि आजारी व्यक्तींना अधिक अस्वस्थता जाणवत असल्याचे दिसून येते.
ग्राहकांनी बँक प्रशासनाकडे अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करणे, आणखी एक कॅश काऊंटर सुरू करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करणे आणि वीज खंडित झाल्यास आवश्यक सुविधा वाढविण्याची मागणी केली आहे. टिटवाळा परिसरातील हजारो ग्राहक या शाखेवर अवलंबून असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष घालून परिस्थितीत सुधारणा करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.















Leave a Reply