**टिटवाळा, प्रतिनिधी :** ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विश्व हिंदू परिषद – बजरंग दल, कल्याण जिल्हा, टिटवाळा प्रखंड यांच्या वतीने रविवारी (२८ जून) सकाळी ७.३० वाजता रीजेंसी सर्वम गार्डन, टिटवाळा येथे बालोपासना कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला टिटवाळा प्रखंड अध्यक्ष सूर्यकांत भोय यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रमुख वक्ते म्हणून जिल्हा सहमंत्री लक्ष्मीकांत पाठक यांनी उपस्थित बालक व कार्यकर्त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श, राष्ट्रभक्ती, हिंदू संघटन, धर्मरक्षण तसेच संस्कारांचे महत्त्व याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
मुख्य शिक्षक म्हणून जिल्हा सह धर्मप्रसार प्रमुख कृष्णा तिवारी यांनी प्रार्थना, व्यायाम, गीत आणि बौद्धिक सत्राच्या माध्यमातून बालोपासनेचे संचालन केले. यावेळी बालकांमध्ये शिस्त, सेवा, संस्कार आणि संघटनभावना रुजविण्याचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात बालकांसह कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी समाजात सुसंस्कृत व राष्ट्रभक्त युवा पिढी घडविण्यासाठी नियमितपणे बालोपासना कार्यक्रम राबविण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विश्व हिंदू परिषद – बजरंग दल, कल्याण जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
















Leave a Reply