मेगा पर्ल प्रकल्पाच्या निष्काळजीपणामुळे शिव मंदिर मुख्य रस्त्यावर अपघातांची मालिका; मनसेचा आंदोलनाचा इशारा

 

टिटवाळा : टिटवाळा पूर्व येथील गणेश मंदिर रोडवरील शिव मंदिराजवळ सुरू असलेल्या मेगा पर्ल प्रकल्पाच्या कथित निष्काळजीपणामुळे परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला असून, रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यामुळे वारंवार अपघात घडत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामानंतर रस्ता योग्य पद्धतीने पूर्ववत न केल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अनेक वाहनांचे नुकसान झाल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रश्नात उडी घेतली. नागरिकांच्या तक्रारीनंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी संबंधित विकासकाची आज प्रत्यक्ष भेट घेत रस्त्याच्या दुरुस्तीबाबत जाब विचारला. शिव मंदिर मुख्य रस्त्यावर निर्माण झालेला मोठा खड्डा नागरिकांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका ठरत असल्याचे सांगत मनसेच्या वतीने विकासकाला दोन ते तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

या मुदतीत सदर खड्डा काँक्रिटने व्यवस्थित भरून रस्ता पूर्ववत करण्याची मागणी करण्यात आली असून, विकासकानेही दोन दिवसांत आवश्यक दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली. मात्र, केवळ आश्वासनांवर समाधान मानणार नसल्याचे स्पष्ट करत मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

“नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. रस्त्यावरील निष्काळजीपणामुळे अपघात होत असतील, वाहनांचे नुकसान होत असेल आणि सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असेल, तर मनसे गप्प बसणार नाही,” असा स्पष्ट इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला. तसेच दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास संबंधित खड्ड्यात “वृक्षारोपण आंदोलन” करून विकासक व प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या वेळी ॲड. अविनाश शिळकंदे, दिलीप राठोड, रोहित जोशी, मिलिंद ठाकरे, गिरीश यशवंतराव यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *