टिटवाळा, वार्ताहर : टिटवाळा पश्चिमेकडील पोल क्रमांक ४ परिसरातील जानकी, केदारनाथ, गीतांजली, माउली धाम तसेच गजानन चाळ रोड या भागात गेल्या काही दिवसांपासून पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. संध्याकाळनंतर परिसर अंधारमय होत असल्याने येथील रहिवाशांना भीतीच्या वातावरणात वावरावे लागत होते. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत होती.
रस्त्यावर प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली होती, तसेच सामाजिक सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला होता. वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती.
याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे वार्ड क्र . ८ मांडा टिटवाळ्याचे अध्यक्ष विनोद लोखंडे यांनी पुढाकार घेत परिसराची पाहणी केली. त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून समस्या प्रत्यक्ष समजून घेतली आणि तत्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर तांत्रिक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पथदिव्यांची दुरुस्ती सुरू केली.
या कामामुळे परिसरात पुन्हा प्रकाश व्यवस्था सुरू होण्यास सुरुवात झाली असून नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. स्थानिकांनी विनोद लोखंडे यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत “वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे आमच्या समस्येला मार्ग मिळाला,” अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी पुढील काळात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी प्रशासनाने नियमित देखभाल आणि तत्पर सेवा द्यावी, अशी मागणी केली आहे.















Leave a Reply