टिटवाळा (प्रतिनिधी) : टिटवाळा पूर्वेतील फाटक परिसर सध्या अक्षरशः धोक्याच्या छायेत सापडला आहे. अनधिकृत फेरीवाले तसेच भाजी विक्रेत्यांनी रस्त्याचा मोठा भाग व्यापल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असून स्थानिक नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. रिक्षा उभ्या करण्यास जागा नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे, तर वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे.
टिटवाळा पूर्व वाजपेयी चौकानजीक असलेल्या जुन्या फाटक परिसराजवळ सध्या हे चित्र पाह्यला मिळत आहे . या समस्येची तीव्रता आणखी वाढवणारी बाब म्हणजे या अनधिकृत स्टॉलच्या अगदी मागे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डचा उच्च दाबाचा डीपी (ट्रान्सफॉर्मर) उभा आहे. परिसरात दिवसभर मोठी वर्दळ असते, त्यातच जवळच असलेल्या अंकित स्कूलमुळे विद्यार्थ्यांची सतत ये-जा सुरू असते. शाळा सुटण्याच्या वेळी येथे अक्षरशः गर्दीचा स्फोट होतो. अशा परिस्थितीत जर शॉर्ट सर्किट किंवा अन्य विद्युत अपघात झाला, तर मोठा अनर्थ घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या गंभीर समस्येबाबत अनेकदा तक्रारी करूनही कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, यामागे काही आर्थिक व्यवहार सुरू आहेत का, असा संशयही व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची जोरदार मागणी केली आहे. अनधिकृत भाजी स्टॉल त्वरित हटवून रस्ता मोकळा करावा, वाहतूक सुरळीत करावी, तसेच उच्च दाबाच्या डीपीजवळ आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी पुढे येत आहे. यासोबतच निष्काळजीपणा करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी जोर धरत आहे.
या गंभीर प्रकरणात प्रशासन आता काय पावले उचलते, याकडे टिटवाळा पूर्वेतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास एखादा मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जात असून, प्रशासनाने तातडीने जागे होण्याची गरज अधोरेखित होत आहे.















Leave a Reply