महानगरपालिकेच्या वतीने डोंबिवलीत पुष्पचक्र अर्पण; मान्यवर व नागरिकांची उपस्थिती
कल्याण : मातृभूमीच्या रक्षणासाठी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या डोंबिवलीतील शूर वीर कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या २३व्या स्मृतीदिनी, २४ मार्च रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे त्यांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. वै. ह. भ. प. सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे आयोजित या कार्यक्रमात मान्यवर, कुटुंबीय आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मृतीदिनानिमित्त कॅप्टन सचान यांच्या वडिलांनी राजाबेटा सचान आणि आई सुधा सचान यांनी सर्वप्रथम स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आपल्या सुपुत्राच्या शौर्याला अभिवादन केले. त्यानंतर महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल दामले, पद्मश्री विजेते गजानन माने तसेच हुतात्मा प्रतिष्ठानच्या वतीने निवृत्त लेफ्टनंट कमांडर डॉ. सुनिल कांबळे यांनीही स्मारकाला अभिवादन केले.
या कार्यक्रमास महापालिका सचिव किशोर शेळके, उपआयुक्त बाळासाहेब चव्हाण, नगरसेविका रेखा चौधरी, महेश पाटील, सुनिता पाटील, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, ६/फ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद ठाकुर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. याशिवाय शाळांतील विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनीही मोठ्या संख्येने हजेरी लावत शहीद सैनिकाला आदरांजली अर्पण केली.
कॅप्टन विनयकुमार सचान यांनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध लढताना दाखविलेल्या शौर्याची आठवण यावेळी उपस्थितांनी कृतज्ञतेने केली. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांच्या स्मृती जपण्याचा आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.दरम्यान, अशा स्मृतीदिनांच्या माध्यमातून तरुण पिढीला देशसेवेची प्रेरणा मिळावी आणि शहीद जवानांच्या बलिदानाची जाणीव समाजात कायम राहावी, हा उद्देश असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.















Leave a Reply