गुरुपौर्णिमेच्या दिवशी टिटवाळ्यात ‘जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र’ (विस्तारित केंद्र) चे उद्घाटन

Screenshot 2025 07 11 124232

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विभागाचा ‘बालवाडी शिक्षिका अभ्यासक्रम’ येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू

टिटवाळा : अजय शेलार 

गुरुपौर्णिमा हा दिवस ज्ञान, संस्कार आणि गुरूशिष्य परंपरेचा सन्मान करणारा असतो. याच दिवशी, १० जुलै २०२५ रोजी, टिटवाळा येथे ‘जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र’ (विस्तारित केंद्र) या नव्या शैक्षणिक उपक्रमाचे भव्य उद्घाटन समारंभ पार पडले. या प्रसंगी एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे संचालक प्रा. डॉ. प्रभाकर चव्हाण यांच्या शुभहस्ते या केंद्राचे विधिवत उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या मान्यवर, विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे, येत्या शैक्षणिक वर्षापासून टिटवाळ्यातील या मार्गदर्शन केंद्रात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या अंतर्गत ‘बालवाडी शिक्षिका’ अर्थात Montessori Teacher एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. या उपक्रमामुळे महिलांना शिक्षणाच्या नव्या संधी प्राप्त होणार असून स्वावलंबनाचा मार्ग सुकर होईल, असा विश्वास यावेळी वक्त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात मार्गदर्शन केंद्रात पूर्वी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनीही आपले अनुभव उपस्थितांशी शेअर केले. त्यांनी आपल्या भाषणातून केंद्राने दिलेल्या प्रेरणा, मार्गदर्शन आणि आत्मविश्वासाबाबत कृतज्ञता व्यक्त केली. यामुळे केंद्रातील अभ्यासक्रमांचा दर्जा आणि त्याचा सकारात्मक परिणाम अधोरेखित झाला. भविष्यात या केंद्रामार्फत युवकांसाठी स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्त्व विकास, करिअर मार्गदर्शन, संवाद कौशल्ये आणि रोजगाराभिमुख उपक्रम यांसारख्या अनेक कार्यशाळा, मार्गदर्शन सत्रे आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

‘जागृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र’ हे केवळ स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे केंद्र नसून, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी एक सक्रिय मंच म्हणून काम करेल, अशी अपेक्षा या उद्घाटन सोहळ्यातून व्यक्त झाली. गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी सुरू झालेला हा नवा शैक्षणिक अध्याय निश्चितच अनेकांना उज्वल भविष्याकडे घेऊन जाणारा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *