मोदींच्या वाढदिवसानिमित्त काळू नदीत स्वच्छतेचा संकल्प – अर्धवट गणेशमूर्तींचे विधीपूर्वक विसर्जन”

549672375 4204100043195855 8803442928942936386 n

टिटवाळा : भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून टिटवाळा येथेही भाजपाचे पदाधिकारी माजी नगरसेवक सुरेश भोईर तसेच कल्याण जिल्हा सचिव प्रदीप भोईर यांच्या नेतृत्वात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. काळू नदीवरील गणेशघाट परिसरात गणेशोत्सव काळात अनेक गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. मात्र, नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर काही मूर्ती अर्धवट अवस्थेत आढळून आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत काळू नदी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. नदीच्या पात्रातून अर्धवट पडलेल्या गणेशमूर्ती बाहेर काढून विधीपूर्वक पाण्यात विसर्जित करण्यात आल्या. त्याचबरोबर नदीकाठी साचलेले निर्माल्य, प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला.

कार्यकर्त्यांनी केशरी टोपी, स्कार्फ परिधान करून नदीत उतरून स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली. या उपक्रमामुळे गणेशघाट परिसर अधिक स्वच्छ व आकर्षक झाला असून पर्यावरण संरक्षणाचा संदेशही यातून देण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ स्वच्छतेपुरता मर्यादित न राहता श्रद्धा, संस्कृती आणि पर्यावरण या तिन्हीचा संगम ठरला आहे. स्थानिक नागरिकांनीही या कार्याचे कौतुक केले असून आगामी काळात अशा मोहिमांना अधिकाधिक प्रमाणात हातभार लावण्याची तयारी दर्शविली आहे.
याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते पंडित कुलकर्णी , जयराम भोईर , त्रंबक चौधरी यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *