भाजपातील कलह टोकाला; ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा उबाठा गटात प्रवेश, मातोश्रीवर शक्तीप्रदर्शन
टिटवाळा : कल्याण तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून उसळलेल्या राजकीय हालचालींनी आता उघड संघर्षाचे रूप धारण केले आहे. महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप, शिवसेना, काँग्रेस व मनसेमधील प्रवेश-निर्गमाच्या मालिका सुरू असताना संपूर्ण तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. विशेषतः भाजपमध्ये वाढत चाललेल्या ‘इनकमिंग’मुळे जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी तीव्र बनली असून, अनेकांनी उघड बंडाची भूमिका घेतली आहे.
टिटवाळा भाजपमध्ये याचा सर्वाधिक परिणाम दिसून आला. प्रदीप भोईर (कल्याण जिल्हा सचिव – भाजपा) आणि सुरेश भोईर (माजी नगरसेवक, महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य – भाजपा) यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. स्थानिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष, अचानक दिल्या जाणाऱ्या ‘डायरेक्ट एन्ट्री’, निष्ठावान कार्यकर्त्यांना न मिळणारा मान आणि स्थानिक समीकरणांकडे दुर्लक्ष—या मुद्द्यांमुळे अखेर या वरिष्ठ नेत्यांनी निर्णायक पाऊल उचलले.
या नाराजीला मोठे वळण मिळाले ते शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता मातोश्री (कलानगर, बांद्रा पूर्व) येथे. तमाम समर्थकांसह प्रदीप भोईर व सुरेश भोईर यांनी औपचारिकरीत्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात प्रवेश केला. या प्रवेशामुळे टिटवाळ्यासह संपूर्ण कल्याण तालुक्यातील राजकीय समीकरणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
दरम्यान, वॉर्ड पुनर्रचना आणि महापालिकेच्या अधिकारक्षेत्रातील बदलांमुळे तालुक्यातील मतदारसंघाची रचना बदलली असून, त्याचा थेट फटका पक्षांच्या आगामी रणनीतीवर बसत आहे. भाजपला वाढत्या असंतोषाचा सामना करावा लागत असताना विरोधक हा असंतोष भांडवलात रूपांतर करण्यास सज्ज असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आगामी निवडणुका कल्याण तालुक्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार असल्याची राजकीय तज्ज्ञांचीही प्रतिक्रिया आहे.
या प्रसंगी प्रदीप भोईर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले,
“गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ आमचे कुटुंब भाजपाशी निष्ठेने जोडलेले होते. पक्ष सोडताना वेदना होत आहेत; मात्र स्थानिक कार्यकर्त्यांचा अपमान आम्हाला मान्य नव्हता. आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शिवसेनेसाठी काम करणार आहोत. यावेळी आमच्या पॅनलमधील सर्व उमेदवारांना मोठ्या ताकदीने विजयी करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वेळी शिवसेनेचे उपनेते विजय बंड्या साळवी, शहर प्रमुख बाळा परब, उपशहर प्रमुख किशोर शुक्ला यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.













Leave a Reply