टिटवाळा : अजय शेलार
टिटवाळ्याची राजकीय हवा आता स्पष्टपणे बदलते आहे… व्यापारी संघटनेचे कार्याध्यक्ष समीर मसिलकर यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाने काल या बदलाला ठळक अधोरेखित केले. हा केवळ शुभेच्छांचा सोहळा नव्हता, तर येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या राजकारणात मसिलकर यांनी आपली दमदार उपस्थिती दाखवण्याचा क्षण ठरला. विविध पक्षांचे नेते, कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आणि व्यापाऱ्यांचा ठासून सहभाग — या सर्वामुळे टिटवाळ्यात एकच चर्चा रंगली आहे की, “ही ताकद कशाची? कोणासाठी?”
गेल्या काही महिन्यांत मसिलकर यांची लोकप्रियता सातत्याने वाढत असून व्यापाऱ्यांचे प्रश्न, यावर त्यांनी घेतलेली थेट भूमिका आणि गेल्या काही दिवसांतला वाढता जनसंपर्क त्यांना एक भक्कम वलय प्रदान करते आहे. आज ते केवळ व्यापाऱ्यांचे नेते राहिलेले नसून — शहरातील युवा, नागरिक, महिला गटांमध्येही त्यांची प्रतिमा अधिक मजबूत होताना दिसते आहे. वाढदिवसाच्या कार्यक्रमात भाजपसह इतर पक्षांचेही मोजकेच नव्हे तर वजनदार पदाधिकारी जमल्याने राजकीय समीकरणांमध्ये नवा गोंधळ निर्माण झाला आहे. “मसिलकर यांचे झुकते माप भाजपकडे!?” अशी कुजबुज खासदार-आमदारांच्या कानावरही गेल्याचे बोलले जाते. काहींचे मत तर आणखी पुढे — “महापालिकेत टिटवाळा काबीज करायचा असेल तर मसिलकर यांची साथ मिळवणे अपरिहार्य!” असल्याचे बोलले जात आहे .
मात्र मसिलकर यांनी कोणताही राजकीय पक्ष जाहीर न करता सर्वांसोबत सख्य राखणे हेच अधिक खुमासदार ठरत आहे. त्यामुळेच ते कोणाशी हातमिळवणी करतात, कोणाच्या विरोधात उभे राहतात यावरून टिटवाळ्याचा सत्तेचा रंग ठरणार, हे स्पष्ट आहे. एकीकडे भाजपचे डोळे मसिलकरांवर, तर दुसरीकडे स्थानिक नेतेही “आपणच जवळचे” ठरवण्यासाठी धडपडताना दिसले. टिटवाळ्याच्या राजकारणात आतापर्यंत काही नावांचीच चर्चा होती. मात्र आता समीर मसिलकर हे समीकरण पालटू शकणारे नवे केंद्रबिंदू ठरत आहेत. व्यापाऱ्यांचा ठाम पाठिंबा, नागरिकांमधील वाढता विश्वास आणि सर्वच पक्षांशी जमलेली गोडी — या तिन्ही मिश्रणाने त्यांची प्रतिमा संभाव्य ‘किंगमेकर’ म्हणून झळकत आहे.
महापालिका निवडणूक जवळ येत असतानाच मसिलकर यांच्या वाढदिवसाच्या यशस्वी शक्तिप्रदर्शनाने टिटवाळा राजकारणात थरारक रंग चढले आहेत.
आता फक्त एकच प्रश्न सर्वांना छळतोय —
“समीर मसिलकर कुणाच्या मैदानात उतरणार? आणि त्यांच्या पावलावरून शहराचे भविष्य कोणत्या दिशेने वळणार?”













Leave a Reply