महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे महेश एगडे मशाल चेतवणार

Whatsapp image 2025 12 20 at 8.43.25 pm (2)

युवासेना शहर सचिव महेश एगडे यांची उमेदवारीसाठी ठाम दावेदारी

टिटवाळा | अजय शेलार
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिटवाळ्यात राजकीय वातावरण तापू लागले असून युवासेना कल्याण शहर सचिव महेश एगडे यांनी थेट रणांगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. “जय महाराष्ट्र. आज पक्षाकडे अधिकृतपणे उमेदवारी मागितली आहे. उध्दवसाहेब ठरवतील ते धोरण आणि पक्ष बांधेल ते तोरण. टिटवाळ्याचा विकास हाच ध्यास. निष्ठेने काम केलंय, निष्ठेने लढू,” अशी ठाम भूमिका सोशल मीडियावरील पोस्टद्वारे मांडत एगडे यांनी टिटवाळ्यातून महापालिका निवडणूक लढवण्यासाठी दंड थोपटले आहेत.

महेश एगडे हे गेल्या अनेक वर्षांपासून टिटवाळा परिसरात सातत्याने सामाजिक, विकासात्मक आणि संघटनात्मक काम करत असून आपल्या राजे ग्रुप आणि युवासेनेच्या माध्यमातून त्यांनी युवकांना मोठ्या प्रमाणात संघटित केले आहे. स्थानिक प्रश्न, नागरी सुविधा, पायाभूत विकास, वाहतूक, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसारख्या मुद्द्यांवर त्यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच त्यांच्या या घोषणेमुळे टिटवाळ्यातील राजकीय चर्चांना वेग आला आहे.

“पक्ष जो आदेश देईल, तीच माझ्यासाठी लक्ष्मणरेषा आहे,” असे स्पष्ट करत एगडे यांनी नेतृत्वावर संपूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. पक्षाने संधी दिल्यास टिटवाळ्याचा सर्वांगीण विकास हाच केंद्रबिंदू ठेवून निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

महेश एगडे यांच्या या भूमिकेमुळे टिटवाळा महापालिका निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे असून, युवासेना आणि शिवसैनिकांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता पक्षनेतृत्व काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *