कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी टिटवाळ्यात पोलिसआणि सर्वपक्षीय समन्वय बैठक

Img 20251227 wa0031

टिटवाळा, वार्ताहर : आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेऊन निवडणुका शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी कल्याण तालुका पोलिसांच्या पुढाकाराने टिटवाळा येथे समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला मुरबाड उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच इच्छुक उमेदवार उपस्थित होते. मुक्त आणि पारदर्शक मतदान प्रक्रिया ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेश या बैठकीत दिला गेला.

बैठकीत संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांच्या सुरक्षेची आखणी, गस्त वाढविणे, तात्काळ प्रतिसाद देणाऱ्या पथकांची नियुक्ती, गोंधळ अथवा दबावात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या घटकांवर कठोर कारवाई अशा मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. निवडणुकांच्या काळात कोणत्याही प्रकारचे अवैध प्रलोभन, धमकी, पैसे किंवा दारूवाटप यांसारख्या अनैतिक कृत्यांना कडक प्रतिबंध घातला जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला. तक्रारींसाठी मदत क्रमांक उपलब्ध ठेवून नागरिकांना धाडसाने पुढे येण्याचे आवाहनही करण्यात आले.

सोशल मीडियावर होणाऱ्या अपप्रचार व दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर बारीक नजर ठेवली जाणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांसाठी मतदान केंद्रांवर सुरक्षित आणि सुलभ व्यवस्था निर्माण करण्यावरही विशेष भर देण्यात आला.

या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आदर्श आचारसंहिता पाळण्याची लिखित व तोंडी हमी देत शांत, स्वच्छ आणि लोकशाही मूल्यांना अनुसरून निवडणूक लढवण्याची भूमिका मांडली. परस्पर संवाद आणि समन्वय वाढवून गैरसमज टाळण्याचा निर्धार व्यक्त करत सर्वांनी संयुक्तपणे निवडणुकीचे वातावरण सलोख्याचे ठेवण्याचे आश्वासन दिले.

टिटवाळ्यासह संपूर्ण कल्याण तालुक्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवून नागरिकांचा मतदानावरील विश्वास अधिक बळकट करण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचे चित्र या बैठकीतून उमटले. निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असून तो शांततेत आणि शिस्तबद्धतेत पार पडणे हीच काळाची गरज असल्याचा एकमुखी निष्कर्ष यावेळी नोंदविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *