टिटवाळा : मुंबई विभागीय शिक्षक अधिकारी–कर्मचारी योगासने स्पर्धेत छत्रपती शिक्षण मंडळाच्या मांडा–टिटवाळा येथील विद्यामंदिर शाळेचे योगाचार्य गोपाळ दीक्षित यांनी उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. ही स्पर्धा २२ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबई महानगरपालिका प्राथमिक शाळा क्रमांक १०, सेक्टर २०, नेरूळ गाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत मुंबई विभागातील विविध शाळांमधील शिक्षक व कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. ४६ ते ५८ या वयोगटात झालेल्या चुरशीच्या स्पर्धेत योगाचार्य गोपाळ दीक्षित यांनी आपल्या उत्कृष्ट योगसाधना, शिस्तबद्ध सादरीकरण आणि आत्मविश्वासाच्या बळावर परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या अचूक आसनप्रदर्शनामुळे त्यांना द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला.
या यशाच्या जोरावर १७ जानेवारी २०२६ रोजी नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योगासने स्पर्धेसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड विद्यामंदिर शाळेसह संपूर्ण छत्रपती शिक्षण मंडळासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
योगाचार्य गोपाळ दीक्षित यांच्या या यशाबद्दल केडीएमसीचे शिक्षणाधिकारी, विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक, तसेच सर्व शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही ते उत्तम कामगिरी करून यश संपादन करतील, अशा शुभेच्छा सर्वांनी व्यक्त केल्या आहेत.
योगशिक्षणाच्या माध्यमातून आरोग्य, शिस्त आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या योगाचार्य गोपाळ दीक्षित यांच्या या यशामुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.













Leave a Reply