केवळ पक्षनिष्ठा नव्हे, तर उमेदवाराचा चेहरा ?
यंदा या प्रभागात सत्ताधारी भारतीय जनता पार्टी–शिवसेना–रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया–लहुजी सेना युती, मनसे–शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)–काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी असे अनेक राजकीय प्रवाह थेट आमनेसामने उभे ठाकले आहेत. मात्र या सगळ्या समीकरणांमध्ये एक बाब ठळकपणे जाणवते, ती म्हणजे मतदार यंदा केवळ पक्षनिष्ठेवर नव्हे, तर उमेदवाराचा चेहरा, त्याची कामगिरी, सामाजिक प्रतिनिधित्व आणि स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिका पाहून मतदान करण्याच्या मानसिकतेत दिसत आहेत.
राज्यात सत्ता आणि यंत्रणा हातात असूनही मूलभूत प्रश्न रखडले ?
सत्ताधारी भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीने या प्रभागात पूर्ण ताकदीनिशी प्रचार सुरू केला आहे. मोठ्या नेत्यांचे चेहरे, ‘विकास’चा नारा आणि संघटनात्मक यंत्रणा हे या युतीचे प्रमुख भांडवल आहे. दोन वेळा नगरसेवक पद आणि एकदा उपमहापौर पद भूषविलेल्या उपेक्षा भोईर यांची जनमानसत असलेली प्रतिमा , त्यांचा दांडगा संपर्क , रस्त्यावर उतरून केलेली अनेक आंदोलने आणि मधल्या काळात आश्वासक बनलेला चेहरा ही जमेची बाजू आहे .मात्र पक्षाअंतर्गत झालेली बंडखोरी केवळ हीच एक मोठी अडचण त्यांना आव्हान ठरण्याची जास्त शक्यात असल्याचे बोलले जात आहे . मनसेला जय महाराष्ट्र करत शिंदे गटातून उमेदवारी घेत आलेले बंदेश जाधव यांच्या प्रचारात जोर दिसत असला तरी तो युतीतला असून त्यांचे स्वत:चे प्राबल्य दाखवण्याची देखील वेळ आली आहे . त्यामुळे ही लढत त्यांना देखील वैयक्तिक गांभीर्याने घेणे गरजेचे आहे रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, दिवाबत्ती आणि सार्वजनिक सुविधांवर काम केल्याचा दावा सत्ताधारी करीत असले तरी कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा, अनधिकृत बांधकामे, पावसाळ्यातील पूरस्थिती, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या आरोग्य सुविधा यावरून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. केंद्रात आणि राज्यात सत्ता आणि यंत्रणा हातात असूनही मूलभूत प्रश्न सुटले नाहीत, हा विरोधकांचा आरोप यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बंडखोरी भारी पडणार ?
या सगळ्या पार्श्वभूमीवर टिटवाळा शहराच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि निर्णायक घडामोड म्हणजे भाजपचे माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत यांची बंडखोरी. पोटनिवडणूक जिंकून नगरसेवक आणि पुढे उपमहापौरपदापर्यंत मजल मारलेले सरनोबत एकेकाळी शहरातील आशेचे नेतृत्व मानले जात होते. २०२६ च्या निवडणुकीत महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी तयारी केली होती. मात्र अंतर्गत गटबाजी, वरिष्ठ पातळीवरील निर्णय आणि तिकीट नाकारल्याने दुखावलेल्या सरनोबत यांनी पक्षीय राजकारणाला छेद देत ‘मांडा–टिटवाळा–आटाळी परिवर्तन आघाडी’ स्थापन करण्याचा धाडसी निर्णय घेतला. दोन दशकांहून अधिक काळ सामाजिक कार्य, आंदोलने, शाळांचे प्रश्न तसेच वीज, गॅससारख्या मूलभूत प्रश्नांवर लढा देणारे सरनोबत आज सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान देणारे नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. शिंदे गटाकडून तिकीट नाकारलेले विजय (भाऊ) देशेकर, भाजपकडून शब्द मोडल्याने दुखावलेले मोरेश्वर (अण्णा )तरे आणि सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केलेले सचिन अल्हाट यांची साथ मिळाल्याने ही परिवर्तन आघाडी प्रभागात प्रभावी ठरत आहे.
डबल इंजिन तारणार का ?
दुसरीकडे ४० वर्षे जुने भाजपचा टिटवाळ्यातील चेहरा मानले जाणारे माजी नगरसेवक सुरेश भोईर यांचा मुलगा प्रदीप भोईर यांच्या तिकिटावर भाजपने नकार शिक्का मारल्याने त्यांनी सरळ उबाठा सेनेशी हातमिळवणी करत या अपमानाचे उत्तर देण्यासाठी आपल्या बाहू सरसावल्या आहेत . त्यातच इथला मुरलेला राजकारणी म्हणून ओळख असणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कल्याण विधानसभा संघटक किशोर शुक्ला यांनी देखील भोईर यांचे खुल्या दिलाने स्वागत केल्याने हे डबल इंजिन मनसेच्या इंजीनला देखील तारून नेईल असा सूर जनतेत आहे . शुक्ला यांचा प्रचारातला सक्रीय सहभाग आणि त्यातच युतीत असलेली मनसेची नव्या दमाची युवा पिढी प्रचारात जीव ओतून काम करत असल्याने ही ताकद अजून चौपटीने वाढली आहे . त्यातच मनसेने दिलेला भूषण जाधव हा सुक्षित आणि सुसंस्कृत चेहरा हा युतीला तारणारा ठरेल असे जाणकारांचे मत आहे .
तरेंमधून कोण तरणार ..?
हे तरे कि…ते तरे?
भाजपाचे संतोष तरे आणि अपक्ष मधून लढत असलेले मोरेश्वर तरे या दोघाही उमेदवारांचा आप आपला चाहता वर्ग असल्याने त्यांच्यात संमिश्र वातवरण पाह्यला मिळत आहे. तोही चांगला आणि हाही चांगला असे काहीसे सूर जनतेतून आहेत . मात्र आपल्या भाविकतले असलेले त्यांचे वजन हे देखील त्यांच्या मतपेटीवर प्रभाव करणार आहे .
नागरिककेंद्री प्रशासनाचा अजेंडा चालेल का ?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसन पार्टी यांच्याकडून जातीय व सामाजिक प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुढे करत “वंचितांना संधी” असा सूर लावला आहे. प्रचार मुद्देसूद असला तरी संघटनात्मक कमजोरी आणि कार्यकर्त्यांमधील उत्साहाचा अभाव हे मोठे आव्हान आहे. आम आदमी पार्टीने स्वच्छ प्रतिमा, भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि नागरिककेंद्री प्रशासनाचा अजेंडा मांडत ‘पर्याय’ बनण्याचा प्रयत्न सुरू केला असून, तरुण व मध्यमवर्गीय मतदारांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. वंचित बहुजन आघाडीने बहुजन प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली असून, तिचा प्रभाव मर्यादित असला तरी मतविभाजनात महत्त्वाची भूमिका बजावण्याची क्षमता आहे. यातील राष्ट्रवादीचे उमेदवार दिपिका भोय हा नवीन चेहरा असला तरी त्यांच्या मागे असलेले जुने जाणते चेहरे अनेक राजकीय गणिते फिरवू शकतात . त्यामुळे त्या देखील या निवडणुकीच्या केंद्रबिंदू ठरू शकतात . आम आदमी पार्टीचे संदीप नाईक बाबा हे आपल्यां फेसबुक लाईव्ह सर्वपरीचीत आहेत . अनेक समस्या त्यानी मार्गी देखील लावलेल्या आहेत . मात्र त्यांना मतपेटीतून जनता किती स्वीकारते हे लवकरच समजेल .
वाद आणि वादातले अडचण ठरणार ?
या निवडणुकीत भाजपसमोरील आणखी एक वादग्रस्त मुद्दा मतदारांच्या चर्चेत आहे. कल्याण–डोंबिवलीत तब्बल २० नगरसेवक बिनविरोध निवडून येणे जरी पक्षासाठी यश मानले जात असले, तरी त्यामागे दबावतंत्र, आर्थिक व्यवहार आणि उमेदवारांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याच्या चर्चांनी भाजपची प्रतिमा डागाळल्याचा आरोप होत आहे. भाजप–सेना–आरपीआय–लहुजी सेना युती असतानाही रिपब्लिकन पार्टी किंवा लहुजी सेनेला एकही जागा न देणे आणि निवडणुकीनंतर “स्वीकृत नगरसेवक” म्हणून जागा देण्याचे आश्वासन देणे, यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर दलितविरोधी भूमिकेचा आरोप होत आहे. त्यातच विलासराव देशमुख यांच्याबाबतचे वादग्रस्त वक्तव्य, बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणाशी संबंधित शाळेच्या ट्रस्टी तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देणे, अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत आणि अकोटमध्ये एमआयएमसोबत केलेल्या युतींमुळे भाजपच्या वैचारिक स्पष्टतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “पार्टी विथ डिफरन्स” म्हणवणाऱ्या भाजपने आपली तत्त्वनिष्ठ भूमिका बाजूला ठेवली असल्याची टीका होत असून, रवींद्र चव्हाण यांचे प्रदेशाध्यक्षपद टिकेल का, अशी चर्चा उघडपणे सुरू झाली आहे.
परिवर्तनाची लढाई ठरणार ही निवडणूक
कचरा व स्वच्छता व्यवस्थापन, पावसाळी पूर व निचरा, अनधिकृत बांधकामे, वाहतूक व पार्किंग, आरोग्य व शिक्षण सुविधा आणि स्थानिक नगरसेवकांची उपलब्धता व संवाद हे मुद्दे यंदा निर्णायक ठरणार आहेत. मतदार आता केवळ पक्षचिन्हाकडे पाहत नाही, तर “कोण प्रत्यक्ष काम करणार?” हा प्रश्न विचारत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ३ मधील ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडण्यापुरती मर्यादित न राहता स्वाभिमान, विश्वास, नेतृत्व आणि परिवर्तनाची लढाई बनली आहे. कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये प्रभाग क्रमांक ३ हा जणू ‘मिनी महापालिका’ ठरला आहे. सत्ताधारी युतीची ताकद, विरोधकांची एकजूट, बंडखोरांचे आव्हान आणि नव्या राजकीय पर्यायांची घुसखोरी यांचा अंतिम फैसला मतपेटीतून होणार आहे. या प्रभागाचा कौल संपूर्ण कल्याण–डोंबिवलीच्या राजकारणाची दिशा ठरवू शकतो आणि म्हणूनच यंदाची ही लढत केवळ स्थानिक न राहता राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.













Leave a Reply