टिटवाळा, वार्ताहर : ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात एक हळवी, पण माणुसकीवर विश्वास वाढवणारी घटना समोर आली आहे. रस्त्यावर बेवारस अवस्थेत सापडलेल्या एका अज्ञात महिलेच्या मदतीसाठी कल्याण तालुका पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
दिनांक ०७ एप्रिल रोजी सुमारे 30 ते 35 वयोगटातील एक महिला असहाय अवस्थेत आढळून आली. तिची ओळख पटत नव्हती, नातेवाईकांचा काहीच मागमूस नव्हता. अशा वेळी ‘ही आपली जबाबदारी नाही’ असे म्हणत पुढे जाण्याऐवजी, पोलिसांनी तिच्याकडे एक माणूस म्हणून पाहिले — आणि इथूनच सुरू झाली खरी माणुसकीची कहाणी. सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला काळे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासो एडके यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सहकर्मचारी अविनाश पाटील ,अशोक बागुल,गांगुर्डे यांच्या सोबतीने पुढाकार घेत कल्याण तालुका पोलिसांमधील या वर्देत्ल्या माणसांनी तातडीने तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारत, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी मुंबईच्या चेंबूर येथील ग्रेस फाउंडेशन या संस्थेशी संपर्क साधत अधिकृत पत्राद्वारे विनंती केली. फक्त कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यापुरते न थांबता, तिच्या उपचाराची आणि काळजीची पूर्ण जबाबदारी निश्चित व्हावी यासाठीही त्यांनी स्पष्ट निर्देश दिले.
या महिलेबद्दल अधिक माहिती काढली असता असे समजले की , टिटवाळा परिसरातच ती वास्तव्यास असून कोरोना काळात आपल्या नातेवाईकांना गमावल्यामुळे तिची मनस्थिती ढासळली होती . ती एकटी आणि निराधार अवस्थेत पोलिस स्टेशन तसेच आजूबाजूच्या परिसरात भटकत असायची , अनेक दिवस ती भानावर नसल्याने तिच्या अवस्था बिकट झाली होती . तिच्या पायाला जखम होऊन त्यात जंतूसंसर्ग झाला होता . तिची ही अवस्था पाहून टिटवाळा पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला काळे यांना गहिवरून आले . त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या सहकर्मचारी यांच्या सोबतीने आणि आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शखाली या महिलेला मदत केली आहे .
साधारण ३५ वर्ष वयाच्या या महिलेचे नाव नंदिनी शाकियत असल्याचे समजते वर्णन — गोरा वर्ण, सडपातळ बांधा, अंगावर पिवळसर टॉप — इतपतच माहिती उपलब्ध असली तरी, तिच्यासाठी उभे राहणारे हात मात्र अनोळखी नव्हते… ते होते पोलिसांच्या गणवेशातले, पण मनाने माणुसकी जपणारे.
या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, पोलीस केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक नाहीत, तर समाजातील प्रत्येक दुर्बल घटकासाठी आधारस्तंभ आहेत. कोणाचाही आधार नसताना, “आम्ही आहोत” हे दाखवून देणारी ही कृती अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरते.
आजही काही गणवेश फक्त अधिकाराचे प्रतीक नसून, माणुसकीचा स्पर्श जपणारे आहेत — आणि कल्याण पोलिसांनी त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा दिला आहे.














Leave a Reply