सायकलवरून दिला फिटनेसचा संदेश; टिटवाळ्यात ‘फिट इंडिया सायक्लोथॉन 2026’ उत्साहात

टिटवाळा, वार्ताहर : नागरिकांमध्ये फिटनेसबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कल्याण तालुका पोलीस ठाणे आणि ठाणे ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी टिटवाळ्यात ‘फिट इंडिया सायक्लोथॉन 2026’ या भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. विविध वयोगटांतील नागरिक, युवक आणि बालसायकलपटूंनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश दिला.

‘फिटनेस का डोस, आधा घंटा रोज’ आणि ‘जो फिट है वो हिट है’ या संकल्पनेवर आधारित या सायक्लोथॉनचा प्रारंभ टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरातून झाला. त्यानंतर गणपती मंदिरापर्यंतचा सुमारे 10 किलोमीटरचा प्रवास सहभागी सायकलपटूंनी पूर्ण केला. रॅलीदरम्यान नियमित व्यायाम, सायकलिंगचे महत्त्व आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

या उपक्रमात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी सहभाग घेतला. सायकलिंगमुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढण्यास मदत होते, तसेच प्रदूषणमुक्त वाहतुकीला प्रोत्साहन मिळते, हा संदेश यावेळी देण्यात आला. रॅलीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड आणि कल्याण तालुका पोलीस निरीक्षक मुकेश ढके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष नियोजन करण्यात आले होते. पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत भविष्यातही अशा आरोग्यवर्धक कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. फिटनेस, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम घडवून आणणारी ही सायकल रॅली टिटवाळ्यातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *