थरारक हत्याकांड; ‘पिंटया उर्फ डोक्या’ची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

तक्रार करण्यास सांगितल्याच्या रागातून कट रचून खून;
तिघे आरोपी पोलिसांच्या ताब्यात

टिटवाळा, वार्ताहर : कल्याण तालुका पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या म्हारळगाव परिसर गुरुवारी रात्री रक्तरंजित हत्याकांडाने हादरला. रविंद्र उर्फ पिंटया उर्फ डोक्या यशवंत अहिरे या ३० वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मृत रविंद्र अहिरे हा म्हारळगाव परिसरात वास्तव्यास होता. त्याचा भाऊ राहुल अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दीपक सुखदेव डांगे याच्यासह विजय भिडे आणि परशुराम भिडे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक एक दीपक डांगे याच्याविरोधात लता माळी नावाच्या महिलेला पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास रविंद्र अहिरे याने सांगितल्याचा राग आरोपींच्या मनात होता. याच कारणातून आरोपींनी कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शुक्रवार दिनांक २२ में रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास म्हारळगाव येथील मलखांब कंपाऊंड परिसरात रविंद्र अहिरे याच्यावर तिघांनी जीवघेणा हल्ला केला.

आरोपींनी धारदार शस्त्राने रविंद्रच्या पोटावर, डोक्यावर, पाठीमागील भागावर, चेहऱ्यावर तसेच शरीराच्या विविध भागांवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात रविंद्र गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रविंद्रला वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी तांत्रिक तपास, स्थानिक माहिती आणि हालचालींचा मागोवा घेत अल्पावधीतच तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पहाटे दोन वाजून बावीस मिनिटांनी या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला.

या हत्येमागे नेमके आणखी कोणते कारण होते का, आरोपींनी हल्ल्यासाठी कोणते शस्त्र वापरले, तसेच पूर्वीपासून वाद होता का याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे म्हारळगाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *