रिलायन्स आणि गेलच्या पाइपलाइनजवळ आग; मोठा स्फोट टळल्याने ग्रामस्थांचा सुटकेचा निश्वास
टिटवाळा : कल्याण तालुक्यातील टिटवाळा नजीकच्या म्हस्कळ गाव परिसरात गुरुवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली आणि काही काळासाठी संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. देवी महालक्ष्मी पॉलिटेक्निक कॉलेजजवळ अचानक लागलेल्या आगीने काही मिनिटांतच रौद्र रूप धारण केले. सुकलेले गवत, कचरा आणि प्लास्टिक स्क्रॅपने पेट घेतल्याने धुराचे मोठे लोट आकाशात पसरले होते. परिसरातील नागरिकांनी घाबरून तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्यात आली.
मात्र या घटनेने सर्वाधिक चिंता निर्माण केली ती म्हणजे ज्या ठिकाणी आग लागली त्या भागातून रिलायन्स आणि गेल गॅस कंपनीच्या महत्त्वाच्या गॅस वाहिन्या जात असल्याची माहिती समोर आली. आगीच्या ज्वाळा आणि गॅस पाइपलाइन यांच्यातील कमी अंतर पाहता काही काळासाठी मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात होती. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, जर आग आणखी काही अंतर पुढे सरकली असती तर परिस्थिती अत्यंत गंभीर बनू शकली असती.
घटनेनंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत संबंधित कंपन्या आणि प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर जोरदार प्रश्न उपस्थित केले. परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती असून आसपास औद्योगिक क्षेत्रही आहे. हजारो कामगार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना गॅस वाहिन्यांच्या परिसरात पुरेशी सुरक्षा नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आपत्कालीन परिस्थितीत कोणती उपाययोजना केली जाते, याबाबतही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
अग्निशमन दलाचे अधिकारी नवाब तडवी यांनी सांगितले की, सुक्या गवतामुळे आग झपाट्याने पसरली होती. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल करण्यात आल्या. सहा कर्मचारी आणि दोन अधिकाऱ्यांच्या मदतीने काही तासांच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचे समजते ,
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी दावा केला की या भागातील सुरक्षेच्या मुद्द्यावर यापूर्वी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे संबंधित यंत्रणांनी दुर्लक्ष केले. आता या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भविष्यात अशी आग अधिक मोठ्या प्रमाणात भडकली तर मोठी जीवितहानी होऊ शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर रिलायन्स आणि गेल गॅस कंपनीने तातडीने गॅस वाहिन्यांच्या सुरक्षेचा आढावा घ्यावा, परिसरात अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा उभारावी आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. “यावेळी नशिबाने मोठी दुर्घटना टळली, पण पुढच्या वेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते,” असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.













Leave a Reply