टिटवाळा : अजय शेलार
दहावी-बारावीच्या निकालानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असताना शिवसेना मांडा-टिटवाळा शाखेकडूनही सामाजिक बांधिलकी जपत यशस्वी विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही उपशहरप्रमुख श्रीधर दादा खिसमतराव यांच्या पुढाकारातून टिटवाळा परिसरातील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले. केवळ गुणांचे कौतुक न करता विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा आणि जिद्दीचा सन्मान व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आल्याने हा क्षण त्यांच्या कुटुंबीयांसाठीही अविस्मरणीय ठरला.
यावेळी आर्या देशमुख हिने ९८.४० टक्के गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. उन्नती शर्मा हिने ९६.४० टक्के गुण मिळवले असून चिन्मय लोंढे आणि सोहम महाडीक यांनी प्रत्येकी ९६ टक्के गुण संपादन करत उल्लेखनीय यश मिळवले. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना भविष्यात उच्च शिक्षण आणि करिअरमध्ये मोठे यश मिळावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.
या कार्यक्रमाला शिवसेना नगरसेवक बंदेश जाधव, श्रीधर दादा खिसमतराव, ज्ञानेश्वर मढवी, बबलेश पाटील, नंदादीप कवे, सुमित परब आणि श्रावण पंडित उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना समाजातील इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.













Leave a Reply