ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप; पोलीस बंदोबस्तात कारवाई, स्थानिकांचा संतापही उसळला
कल्याण : रोशन उबाळे
कल्याण पूर्वेतील खडे गोळवली परिसर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘सत्यम’ उर्फ ‘गणेश भुवन’ डान्स बारवर आज तहसीलदारांच्या पथकाने प्रचंड पोलीस बंदोबस्तात तिसऱ्यांदा बुलडोझर चालवत तोडक कारवाई केली. मात्र ही कारवाई सहज पार पडली नाही; बार चालक आणि कर्मचाऱ्यांनी थेट जेसीबीसमोर झोपून आंदोलन करत प्रशासनाला आव्हान दिल्याने परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
या बारवर शासकीय जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, गेल्या दीड वर्षांत दोन वेळा कारवाई होऊनही बार पुन्हा सुरू झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संबंधित परिसर ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या अखत्यारीत येत असल्याने स्थानिक पातळीवरील नियंत्रण आणि देखरेखीवरही चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, बार चालकाने प्रशासनावर गंभीर आरोप करत ही कारवाई “आकस बुद्धीने” होत असल्याचा दावा केला. “जर ही जमीन शासकीय असेल, तर संपूर्ण परिसरावर कारवाई का नाही? आम्ही सर्व कर भरतो, आमच्याकडे परवानग्या आहेत. काही ब्लॅकमेलरांनी पैशांची मागणी केली होती, ती न मान्य केल्यामुळे अधिकाऱ्यांना हाताशी धरून आमच्यावर अन्याय केला जात आहे,” असा आरोप बार व्यवस्थापनाने केला.
कर्मचाऱ्यांचा संताप अनावर झाल्याने काही काळ प्रशासनालाही कारवाई थांबवावी लागली. मात्र, कारवाई थांबताच स्थानिक नागरिकही संतप्त झाले आणि त्यांनीही घटनास्थळी गोंधळ घालत “वारंवार कारवाई का? एकदाच ठोस निर्णय घ्या,” अशी जोरदार मागणी केली.
या संपूर्ण प्रकारामुळे सरकारी जमिनीवरील अतिक्रमणांवर प्रभावी अंकुश नसल्याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे. वारंवार उभ्या राहणाऱ्या बांधकामांमागे अधिकाऱ्यांच्या संगनमताचे संशय व्यक्त होत असून, अतिक्रमण हटवण्याच्या प्रक्रियेतील ढिसाळपणा आणि व्यवस्थेतील त्रुटी यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे चित्र आहे.














Leave a Reply