टिटवाळ्यात आरोग्य सुविधेची मोठी झेप; श्री महागणपती रुग्णालयात अत्याधुनिक सीटी स्कॅन सेवा सुरू

लीना देवस्थळी यांचे योगदान; ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा, कल्याण-ठाण्याच्या फेऱ्यांतून सुटका

टिटवाळा : टिटवाळा आणि परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून श्री महागणपती रुग्णालयात अत्याधुनिक सीटी स्कॅन सेवा सुरू करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या लीना देवस्थळी यांच्या पुढाकारातून ही सुविधा उपलब्ध झाली असून त्यामुळे टिटवाळा शहरासह ग्रामीण भागातील हजारो रुग्णांना तातडीने आणि माफक दरात निदान व उपचाराची सुविधा मिळणार आहे.

या नव्या सीटी स्कॅन केंद्राचे उद्घाटन बुधवारी लीना देवस्थळी आणि हिंदुजा रुग्णालयाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद लेले यांच्या हस्ते करण्यात आले. अनेक वर्षांपासून टिटवाळा परिसरात सीटी स्कॅनची सुविधा नसल्याने रुग्णांना कल्याण, डोंबिवली किंवा ठाणे येथे जावे लागत होते. विशेषतः अपघातग्रस्त आणि गंभीर रुग्णांना वेळेत तपासणी न मिळाल्याने अनेक अडचणी निर्माण होत होत्या. आता ही सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या केंद्राला यशवंत देवस्थळी यांचे नाव देण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना लीना देवस्थळी यांनी रुग्णालयाच्या प्रवासाचा उल्लेख करताना सांगितले की, सुमारे १४ वर्षांपूर्वी त्यांनी या रुग्णालयाला भेट दिली होती. त्यावेळी नव्याने उभ्या राहणाऱ्या या संस्थेबाबत अनेकांच्या मनात शंका होत्या. मात्र रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि व्यवस्थापनाने नागरिकांचा विश्वास संपादन करत संस्था यशस्वीपणे उभी केली. आज या रुग्णालयाने आधुनिक आरोग्यसेवेच्या दिशेने आणखी एक मोठी झेप घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात प्रमोद लेले यांनीही नव्या सुविधेचे स्वागत करताना सांगितले की, सीटी स्कॅनसारखी अत्याधुनिक सेवा सुरू झाल्याने रुग्णालयाची जबाबदारी वाढली आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त रुग्णांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असून भविष्यात कॅथ लॅबसारख्या आणखी प्रगत सुविधा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

श्री महागणपती रुग्णालयाचे मुख्य परिचलन अधिकारी विक्रांत बापट यांनी सांगितले की, टिटवाळा परिसरातून अनेक महत्त्वाचे महामार्ग जात असल्याने या भागात वारंवार अपघात घडतात. अशा वेळी जखमींना सीटी स्कॅनसाठी कल्याण किंवा अन्य शहरांमध्ये हलवावे लागत होते. त्यामुळे उपचारांमध्ये विलंब होत असे. आता अपघात विभागालगतच सीटी स्कॅन यंत्रणा उपलब्ध झाल्याने अपघातग्रस्त तसेच इतर गंभीर रुग्णांवर तातडीने निदान आणि उपचार करणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे सुविधा सुरू होताच एका महिला डॉक्टरसह काही रुग्णांनी तिचा लाभ घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

रुग्णालय प्रशासनाने ही सेवा माफक दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमातील गरजू रुग्णांनाही या सुविधेचा लाभ मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे ही सुविधा केवळ टिटवाळाच नव्हे तर शहापूर, मुरबाड आणि आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठीही जीवनदायी ठरणार असल्याचे मानले जात आहे.

या उद्घाटन सोहळ्यास क्रिएटिव्ह ग्रुपचे विक्रांत बापट ,सदस्य किशोर गवाणकर, अभिजीत जोशी, आनंद हरकरे तसेच डॉ. संकेत पाठारी, डॉ. रितेश नायक, डॉ. आतिष दीक्षित, डॉ. प्राची दीक्षित, डॉ. हितेंद्र चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. नव्या सीटी स्कॅन सुविधेमुळे टिटवाळा परिसरातील आरोग्यसेवा अधिक सक्षम होणार असून ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *