इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये संशयास्पद हालचाली; 800 लिटरचे चार कॅन भरून डिझेल वाहतूक करताना पिकअप टेम्पो आढळल्याने खळबळ
कल्याण : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात इंधन पुरवठ्यावर दबाव निर्माण झाला असून केंद्र सरकारने डिझेल आणि पेट्रोलचा अनावश्यक साठा टाळण्यासाठी कडक आदेश जारी केले आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनाही सातबारा दाखविल्याशिवाय डिझेल दिले जात नसताना कल्याणमध्ये मात्र केडीएमसीच्या नावाने डिझेलचा खुलेआम काळाबाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कल्याणमधील भोईरवाडी येथील पेट्रोल पंपावर एक पिकअप टेम्पो तब्बल 800 लिटर क्षमतेच्या चार मोठ्या कॅनमध्ये डिझेल भरून नेत असल्याचे काही जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आले. इतक्या मोठ्या प्रमाणात डिझेलची वाहतूक होत असल्याने नागरिकांनी संशय व्यक्त करत चौकशी केली असता, संबंधित टेम्पो चालक आणि पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून हे डिझेल केडीएमसीसाठी असल्याचे सांगण्यात आले. मात्र या उत्तरामुळे नागरिकांचा संशय अधिकच वाढला.
दरम्यान, या प्रकरणाची अधिक माहिती घेण्यासाठी केडीएमसी आणि केडिएमटी प्रशासनाकडे विचारणा करण्यात आली असता, केडिएमटीकडे स्वतःचे अधिकृत डिझेल पंप उपलब्ध असून बाहेरून डिझेल खरेदी केली जात नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे संबंधित टेम्पोमध्ये भरले जात असलेले डिझेल नेमके कोणासाठी आणि कोणाच्या आदेशाने नेले जात होते, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या देशभरात इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात डिझेल साठवणूक आणि वाहतूक होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अशा परिस्थितीत केडीएमसीच्या नावाचा वापर करून डिझेलचा काळाबाजार होत असल्याचा आरोप अत्यंत गंभीर मानला जात आहे. विशेष म्हणजे सामान्य वाहनचालकांना मर्यादित प्रमाणात इंधन दिले जात असताना काही जण मात्र शेकडो लिटर डिझेल सहजपणे मिळवत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित पेट्रोल पंप, टेम्पो चालक आणि डिझेल खरेदीमागील सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाहन चालक आणि नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. तसेच सरकारी संस्थेच्या नावाचा गैरवापर करून काळाबाजार होत असेल तर त्यामागील साखळी उघड करण्याची मागणीही होत आहे.
















Leave a Reply