टिटवाळा : टिटवाळा परिसरातील उड्डाणपूल पुन्हा एकदा अपघातामुळे हादरला आहे. नव्या पाण्याच्या टाकीजवळ, कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या उड्डाणपुलावर दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला. या अपघातात आकाश चौघे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघाताची तीव्रता इतकी होती की काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जखमी अवस्थेत आकाश चौघे याला तातडीने सावरकर नगर येथील आशीर्वाद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. रुग्णालय प्रशासनाने जखमी युवकाच्या नातेवाईकांनी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर टिटवाळा उड्डाणपुलावरील वाढत्या अपघातांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यांत या मार्गावर सातत्याने अपघात होत असून, वाहनांचा बेफाम वेग, वेगमर्यादेचा अभाव आणि वाहतूक नियंत्रणातील ढिसाळपणा यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता असल्याने अपघातांची नेमकी कारणे शोधणे आणि दोषींवर कारवाई करणे अवघड ठरत आहे. अनेक वेळा रिजन्सीकडे जाणारा उड्डाणपूल या ठिकाणी तर रात्रीच्या वेळेस मद्यपी तरुणांचा बाईक रेसिंगचा धिंगाणा या ठिकाणी सातत्याने सुरु असल्याचे देखील समोर आले आहे . तर अनेकजण या ठिकाणी सोशल मिडीयावर फेमस होण्यासाठी अनेक थरारक बाईक स्टंटचा रील करण्यासाठी या उड्डाणपुलावर गर्दी करत असतात . याच पार्श्वभूमीवर स्वतंत्र वाहतूक बीट आणि वाहतूक शाखेचा मुद्दा पुन्हा जोरात पुढे आला आहे. संपूर्ण ठाणे जिल्हा ग्रामीण भागासाठी स्वतंत्र वाहतूक शाखा स्थापन करण्याची मागणी एडवोकेट जितेंद्र जोशी सातत्याने करत आहेत. ही मागणी केवळ कागदावर न राहता तिची अंमलबजावणी लवकरच होईल, असे प्रशासनाकडून पूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, वाढत्या अपघातांची मालिका पाहता ही प्रक्रिया अधिक विलंबित राहणे धोकादायक ठरत असल्याची भावना आता तीव्र होत आहे.
स्थानिक नागरिक, प्रवासी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून आता एकमुखी मागणी होत आहे की, तातडीने स्वतंत्र वाहतूक शाखा स्थापन करून उड्डाणपुलावर कडक वेगमर्यादा लागू करावी, सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी आणि नियमित वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत करावी. अन्यथा, निष्काळजीपणा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे अशा दुर्घटना पुन्हा घडत राहतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
















Leave a Reply