आधारवाडी कारागृहाबाहेर ‘भाईचा बर्थडे’ साजरा महागात; फटाक्यांची आतषबाजी, पोलिसांवर अडथळा — चार जणांवर गुन्हा, तिघे गजाआड
कल्याण : रोशन उबाळे
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी कारागृहाबाहेर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका आरोपीचा वाढदिवस मोठ्या दिमाखात फटाक्यांची आतषबाजी करून साजरा करण्याचा प्रकार चार जणांना चांगलाच महागात पडला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोहोचवणे आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन आरोपींना अटक करून गजाआड करण्यात आले आहे. एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (१४ मार्च २०२६) रात्री उशिरा आधारवाडी कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर “भाई का बर्थडे” असा मोठा बॅनर लावण्यात आला. यानंतर काही जणांनी एकत्र येत मोठ्या आवाजात फटाके फोडून वाढदिवस साजरा केला. या प्रकारामुळे कारागृह परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. रात्रीच्या शांततेत अचानक झालेल्या फटाक्यांच्या आवाजामुळे स्थानिक नागरिक आणि जेल प्रशासनातही खळबळ उडाली.
जेल प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेनंतर खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तपासादरम्यान हा प्रकार नियोजनपूर्वक केल्याचे उघड झाले असून, संबंधित आरोपी हे सराईत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी रोहित जगदाळे, क्षितिज भगत आणि आकाश खडसे या तिघांना अटक करण्यात आली आहे. चौथा आरोपी फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नियुक्त केले आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
दरम्यान, पोलिसांनी या आरोपींची जेल परिसरात धिंड काढत कायद्याचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. या कारवाईमुळे परिसरात कायद्याबाबत जनतेत विश्वास निर्माण झाला असून, अशा प्रकारांना आळा बसणार असल्याचा संदेश देण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अधिकारी वाघमारे करत असून, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी सांगितले की, “कारागृहासारख्या संवेदनशील ठिकाणाबाहेर अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.” सदर घटनेमुळे पुन्हा एकदा कारागृह परिसरातील सुरक्षा आणि देखरेखीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भविष्यात अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
जाहिरात

Screenshot















Leave a Reply