टिटवळ्यात ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : ५ कोटींचा एमडी साठा जप्त, महिला अटकेत

टिटवळ्यात ५ कोटींचा एमडी ड्रग्स साठा जप्त प्रकरण

टिटवळा ड्रग्स प्रकरणात मोठा खुलासा झाला असून एनसीबी आणि पोलिसांच्या कारवाईत ५ कोटी रुपयांचा एमडी साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

  • टिटवळ्यात धडक कारवाई, मोठा ड्रग्स साठा जप्त
  • महिलेच्या घरातून एमडीएमए आणि ‘एमडी बटन’ हस्तगत
  • आधीच्या प्रकरणातून मिळाले धागेदोरे
  • ड्रग्स नेटवर्कचा मोठा उलगडा होण्याची शक्यता
  • पोलिस तपासाची व्याप्ती वाढली

टिटवळा : टिटवळा परिसरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत एनसीबी आणि कल्याण तालुका पोलिसांनी संयुक्त धडक मोहीम राबवली. या कारवाईत ३५ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकडून तब्बल ५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचा एमडी ड्रग्स साठा जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे कल्याण-टिटवळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या घरातून सुमारे २ किलो ३०० ग्रॅमपेक्षा अधिक एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले. यामध्ये एमडीएमए आणि ‘एमडी बटन’ या प्रकारांचा समावेश आहे. शनिवारी उशिरा रात्री टिटवळ्यातील पद्मावती सोसायटी येथे तिच्या भाड्याच्या घरावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या कारवाईचा उगम १५ एप्रिल रोजी उघडकीस आलेल्या एका वेगळ्या ड्रग्स प्रकरणात आहे. त्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीतून या महिलेचा संबंध समोर आला. ती ड्रग्स पुरवठा साखळीतील सक्रिय घटक असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एनसीबी पथकाने कल्याण तालुका पोलिसांच्या मदतीने सापळा रचत महिलेचा ठावठिकाणा शोधून काढला आणि छापा टाकत तिला अटक केली. छाप्यात घरातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ हस्तगत करण्यात आले असून, या प्रकरणाचा विस्तार किती मोठा आहे याचा तपास सुरू आहे. माहितीनुसार, अटक करण्यात आलेली महिला नवी मुंबई येथील रहिवासी असून ती गेल्या दीड महिन्यापासून टिटवळ्यात भाड्याने राहत होती. या काळात ती स्थानिक स्तरावर ड्रग्स वितरणात सहभागी होती का, याची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य पुरवठा साखळीचा उलगडा करण्यासाठी एनसीबीने तपासाची दिशा अधिक व्यापक केली आहे. या कारवाईमुळे मुंबई आणि ठाणे परिसरातील ड्रग्स नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *