टिटवाळा : कल्याण तालुक्यातील म्हारळगाव येथे घरातील कपाटातून सुमारे ₹३ लाख ६० हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने अचानक गायब झाल्याचे निदर्शनास आले. घरातील वस्तूंची नियमित तपासणी करत असताना कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेले दागिने जागेवर नसल्याचे दिसून आले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली. या चोरीमध्ये सोन्याच्या ८ बांगड्या आणि एक ब्रॅसलेट यांचा समावेश असून त्यांची एकूण किंमत सुमारे ₹३.६० लाख इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. घरात जबरदस्तीची तोडफोड आढळून न आल्यामुळे ही चोरी अत्यंत शिताफीने करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे ही चोरी ओळखीच्या व्यक्तीने केली असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. घटनेनंतर तक्रारदाराने तत्काळ पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. चोरी कशी घडली आणि चोरट्यांनी कोणता मार्ग वापरला याचा शोध विविध कोनातून घेतला जात आहे. या घटनेमुळे म्हारळगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी घरातील मौल्यवान वस्तूंबाबत अधिक दक्षता बाळगण्याची गरज व्यक्त केली आहे
घरातील कपाट फोडून ₹3.60 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास














Leave a Reply