महिलेची दीड लाखांची सोनसाखळी लंपास; बोलण्यात गुंतवून हातचलाखी, बदल्यात खड्यांनी भरलेला रुमाल

महिलेची दीड लाखांची सोनसाखळी लंपास; बोलण्यात गुंतवून हातचलाखी, बदल्यात खड्यांनी भरलेला रुमाल

कल्याण : बँकेतून घरी परतणाऱ्या ५५ वर्षीय महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्या गळ्यातील सुमारे दीड लाख रुपये किमतीची ३० ग्रॅम वजनाची सोनसाखळी लंपास केल्याची घटना कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात घडली. दोन अनोळखी व्यक्तींनी मदत करण्याच्या बहाण्याने महिलेला विश्वासात घेत तिची फसवणूक केली. विशेष म्हणजे, सोनसाखळी घेऊन त्याबदल्यात आरोपींनी महिलेला खड्यांनी भरलेला रुमाल हातात दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुशला यादव या आपल्या मुलासोबत काटेमानिवली येथील एसबीआय शाखेत गेल्या होत्या. त्यानंतर त्यांचा मुलगा कामानिमित्त निघून गेला. बँकेचे काम आटोपून यादव रिक्षाने चक्कीनाका परिसरात आल्या आणि तेथून पायी आपल्या घरी जात होत्या. याचदरम्यान सैनी समोसा दुकानाजवळ एका तरुणाने त्यांना थांबवत दादरचा पत्ता विचारला. त्याने आपल्याला कामावरून काढून टाकण्यात आल्याचे सांगत महिलेशी संवाद सुरू केला.

महिलेचे लक्ष संभाषणात गुंतले असतानाच आणखी एक तरुण तेथे आला. त्यानेही मदत करण्याच्या बहाण्याने महिलेशी बोलण्यास सुरुवात केली. दोघांनी मिळून महिलेला अधिक बोलण्यात गुंतवले आणि त्यानंतर बसच्या मागील बाजूस नेले. तेथे एका आरोपीने पैशांनी भरल्याचे भासवणारी काळ्या रंगाची कापडी पिशवी महिलेला दाखवली. या पिशवीतील पैशांच्या सुरक्षेच्या नावाखाली महिलेला तिच्या गळ्यातील सोनसाखळी रुमालात बांधून ठेवण्यास सांगण्यात आले.

महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी तिच्याकडून सोनसाखळी घेतली आणि त्याऐवजी खड्यांनी भरलेला एक रुमाल तिच्या हातात दिला. काही वेळानंतर आपल्याला दिलेल्या रुमालात सोनसाखळी नसल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे समजले. आरोपींनी दिलेल्या गठ्ठ्यात नोटांच्या आकाराचे कागद असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

या घटनेनंतर महिलेने १७ सप्टेंबर रोजी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे. चक्कीनाका परिसरातील तसेच घटनास्थळाच्या आसपासच्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहे. आरोपींनी कोणत्या दिशेने पलायन केले, त्यांच्यासोबत आणखी कोणी होते का आणि याच पद्धतीने त्यांनी यापूर्वी अन्य नागरिकांची फसवणूक केली आहे का, या सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, अनोळखी व्यक्तींकडून रस्त्यात अचानक मदत, पैशांची माहिती किंवा मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या संभाषणाला बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. चक्कीनाका परिसरातील या घटनेमुळे नागरिकांमध्येही चिंता व्यक्त होत असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *