टिटवाळा नजीकच्या सांगोडा गावात घरात घुसून लाखाचे दागिने लंपास

टिटवाळा नजीकच्या सांगोडा गावात घरात घुसून लाखाचे दागिने लंपास

टिटवाळा : कल्याण तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या टिटवाळा नजीकच्या  सांगोडा गाव येथे घरात घुसून एका ६० वर्षीय महिलेच्या अंगावरील तसेच घरातील कपाटात ठेवलेले तब्बल १ लाख ११ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तीन अनोळखी व्यक्तींनी लंपास केल्याची घटना २८ सप्टेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगोडागाव, मांडा-टिटवाळा परिसरातील बामबाई जनार्दन पाटील यांच्या घरात २८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ७.४५ वाजता 20 ते 22 वयातले तीन अनोळखी इसम घुसले. या तिघांनी फिर्यादी महिलेच्या अंगावरील तसेच लाकडी कपाटातील सोन्याचे दागिने घेऊन पलायन केले. चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये सुमारे ३८ हजार रुपये किमतीची कर्णफुले व वेल, ३८ हजार रुपयांची सोन्याची चैन, २५ हजार रुपयांची मोहनमाळ आणि १० हजार रुपये किमतीचे दोन लॉकेट असा एकूण १ लाख ११ हजार रुपयांचा ऐवज असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद असले तरी  महिलेला बांधून ठेवून मग चोरी करण्यात आल्याची माहिती स्थानिक पातळीवर चर्चेत आहे . त्याची स्वतंत्रपणे अधिकृत पडताळणी होणे आवश्यक असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे . पोलिसांच्या तपासात अशी बाब समोर आली असल्यास ती घटनेच्या स्वरूपाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते. मात्र याबाबत अद्यापही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही .

जर जबरदस्ती, धमकी अथवा महिलेला  बांधून ठेवल्याचे  पुरावे तपासात समोर आले, तर घटनेचे स्वरूप त्यानुसार स्पष्ट होईल. दरम्यान रात्री ८ च्या दरम्यान अश्या पद्धतीने दरोडा सदृश्य लुटमार झाल्याने सध्या परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले असून पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे .याबाबत कल्याण तालुका पोलिस स्टेशनचे  प्रभारी अधिकारी मुकेश ढगे यांनी पोलिसांकडून याबाबत सखोल चौकशी आणि तपास चालू असून लवकरच या गुन्ह्यातील आरोपींचा शोध लागेल असे सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *