एकाच रात्रीच्या वादातून दोन FIR; पगारे आणि त्रिपाठी गटाकडून परस्परांवर गंभीर आरोप

टिटवाळा : कल्याण तालुका पोलिस स्टेशन हद्दीत असणाऱ्या मांडा, टिटवाळा परिसरातील सांगोडा रोड, अष्टविनायक कॉलनी येथे 2 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कल्याण तालुका पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एका गुन्ह्यात सोनाली पगारे यांनी विनोद त्रिपाठी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध मारहाण, शिवीगाळ, दमदाटी तसेच कोयत्याने डोक्यावर वार केल्याचा आरोप केला आहे. तर दुसऱ्या गुन्ह्यात विनोद त्रिपाठी यांनी सागर पगारे, सोनाली पगारे, मुकेश दिवे, प्रथमेश कारवारकर, आरती कारवारकर आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध मारहाण, धमकी, लोखंडी रॉडने हल्ला, वाहनांची तोडफोड आणि सोन्याची चैन गहाळ झाल्याचा आरोप केला आहे.

 कल्याण तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीत सोनाली पगारे यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार विनोद त्रिपाठी, अंजली त्रिपाठी, अंश त्रिपाठी, रणवीर राव, विणीता राव, इंदरादेवी, विद्यसागर भगत, अमरजित भगत आणि अनुप भगत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 फिर्यादी सोनाली पगारे यांच्या म्हणण्यानुसार, त्या कामानिमित्त मैत्रिणीकडे गेल्या असताना अष्टविनायक कॉलनीतील त्रिपाठी व त्यांच्या साथीदारांनी  मागील भांडणाचा राग मनात धरून त्यांना व त्यांच्या सोबत असलेल्या सागर पगारे आणि मुकेश दिवे यांना शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच अंश त्रिपाठी आणि रणवीर राव यांनी सागर पगारे व मुकेश दिवे यांना लाकडी काठीने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

 याच फिर्यादीनुसार, अंजली त्रिपाठी यांनी घरात जाऊन कोयता आणला आणि सोनाली पगारे यांच्या डोक्यावर मारल्याचा आरोप आहे. या वेळी प्रथमेश कारवारकर, आरती कारवारकर आणि सुवर्णा दिवे हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ करून ठोश्याबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 दरम्यान, याच घटनेच्या पार्श्वभूमीवर विनोद त्रिपाठी यांनी देखील तक्रार दिल्यानंतर  सोनाली सागर पगारे आणि त्यांच्या सोबत असलेल्या इतर साथीदरांविरोधात   कल्याण तालुका पोलिस स्टेशन टिटवाळा येथे गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात विनोद विश्वनाथ त्रिपाठी यांनी फिर्याद दिली असून सागर पगारे, सोनाली पगारे, मुकेश दिवे, प्रथमेश कारवारकर, आरती कारवारकर आणि दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 विनोद त्रिपाठी यांच्या फिर्यादीनुसार, मागील भांडणाचा राग मनात धरून सोनाली पगारे यांनी व त्यांच्या साथीदारांनी त्यांना, तसेच त्यांची पत्नी अंजना आणि मुलगा अंश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सोनाली पगारे यांनी विनोद त्रिपाठी यांच्या पायावर तसेच शरीराच्या विविध भागांवर चावा घेतल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

 तसेच सागर पगारे यांनी विनोद त्रिपाठी यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने धमकी देत लोखंडी रॉडने त्यांच्या अंगावर आणि डोक्यावर मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत फिर्यादीच्या मोटारसायकलीसह समोरील रहिवासी राणा प्रताप राव यांच्या मोटारसायकलीची तोडफोड करून नुकसान केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. भांडणादरम्यान विनोद त्रिपाठी यांच्या गळ्यातील सोन्याची चैन पडून गहाळ झाल्याचाही दावा करण्यात आला आहे.

 या प्रकरणात दोन्ही बाजूंनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले असल्याने घटनास्थळी नेमका काय प्रकार घडला, दोन्ही बाजूंच्या व्यक्तींची घटनास्थळी उपस्थिती किती होती, मारहाणीचा नेमका क्रम काय होता आणि कोणत्या व्यक्तीने कोणावर हल्ला केला, याची पडताळणी तपासात महत्त्वाची ठरणार आहे.

 त्यासाठी जखमी व्यक्तींचे वैद्यकीय अहवाल, घटनास्थळाची पाहणी, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, उपलब्ध CCTV किंवा मोबाईल व्हिडिओ, कथित हत्यारे, वाहनांच्या नुकसानीची पाहणी तसेच इतर उपलब्ध पुरावे यांच्या आधारे पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले .

 सध्या दोन्ही बाजूंकडून दाखल झालेल्या एफआयआर मध्ये एकमेकांविरुद्ध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्या आरोपांना पुराव्याचा आधार मिळतो आणि घटनाक्रमाची वस्तुस्थिती नेमकी काय आहे, हे पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

 या प्रकरणामुळे मांडा-टिटवाळा परिसरातील पूर्वीच्या वादाला आता कायदेशीर स्वरूप आले असून, एकाच वेळच्या घटनेच्या संदर्भात दाखल झालेल्या दोन्ही गुन्ह्यांच्या तपासातून नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *