‘डबल पैसे’च्या आमिषाने 5.13 कोटींचा गंडा; ‘ड्रीम सनशाइन डिजिटल’चे देशभर जाळे उघड, मानखुर्द ते यूपीपर्यंत गुंतवणूकदारांची फसवणूक
गुंतवणुकीच्या नावाखाली मोठा खेळ; 125 गुंतवणूकदार लुटले, 400 कोटींचा संशयित घोटाळा
रिटर्नचे आमिष, विश्वासाचा घात; ‘ड्रीम सनशाइन’च्या जाळ्यात अडकले शेकडो कुटुंबे
मुंबई : जलद आणि आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून सामान्य गुंतवणूकदारांची तब्बल ₹5,13,85,000 (पाच कोटी तेरा लाख पंच्याऐंशी हजार) रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार मानखुर्द पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातून उघड झाला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून, फसवणुकीचा कालावधी 1 ऑक्टोबर 2022 ते 9 मार्च 2026 असा जवळपास साडेतीन वर्षांचा असल्याचे FIR मध्ये नमूद आहे. तर पोलिसांनी यातील आरोपींच्या मुसक्या आवळणे सुरु केले असून पोलीस सध्या जबरदस्त ‘एक्शन मोड’वर असल्याचे दिसून येत आहे .
तक्रारदार सलमान सरफुद्दीन खान (वय 31) यांनी दिलेल्या माहितीनुसार, “ड्रीम सनशाईन डिजिटल प्रा. लि.” या कंपनीच्या माध्यमातून आरोपींनी गुंतवणूक योजना राबवली. कमी कालावधीत जास्त नफा आणि नेटवर्क मार्केटिंगद्वारे मोठा परतावा मिळेल, असे सांगून लोकांना आकर्षित करण्यात आले. सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना लहान रकमेवर नियमित परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला. यामुळे अधिकाधिक नागरिक या योजनेत ओढले गेले.
तक्रारदाराने विविध टप्प्यांमध्ये ₹2 लाख, ₹3 लाख, ₹1 लाख, ₹7 लाख अशा हप्त्यांद्वारे एकूण ₹23.70 लाखांची गुंतवणूक केल्याचे नमूद आहे. मात्र, फेब्रुवारी 2026 पासून अचानक परतावा बंद झाला आणि कंपनीचे कार्यालयही बंद असल्याचे समोर आले. तपासात समोर आले की, सुमारे 125 गुंतवणूकदारांना अशाच पद्धतीने फसवण्यात आले असून काहींनी ₹30 लाख, ₹45 लाख, ₹20 लाखांपर्यंत मोठ्या रकमा गुंतवल्या होत्या. या प्रकरणात अमानत अली अन्सारी, रहीम अब्दुल अन्सारी, नवाजिश अली अन्सारी, नइम सरवर आणि योगिनी शिर्के यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास निरीक्षक दीपक शिखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देणारी बाब म्हणजे ‘ड्रीम सनशाइन डिजिटल’ या कंपनीचा फसवणुकीचा डाव केवळ मुंबईपुरता मर्यादित नसून उत्तर प्रदेशातील बिजनौरपर्यंत पसरलेला असल्याचे समोर आले आहे. नजीबाबाद परिसरातही याच कंपनीने शेकडो नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक उभी करून अचानक कार्यालय बंद करत संचालक फरार झाल्याची घटना घडली आहे.
तेथेही सुरुवातीला एक लाख रुपयांवर दरमहा सुमारे 5 हजार रुपये परतावा देत विश्वास निर्माण करण्यात आला. पुढे रमजान काळात “डबल फायदा”चे आमिष दाखवत एक लाखावर 9 हजार रुपयांपर्यंत परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले. या जाळ्यात अडकलेल्या अनेकांनी आयुष्यभराची बचत तसेच कर्ज काढून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली.
या संपूर्ण नेटवर्कचे धागेदोरे मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड परिसराशी जोडले गेले असून, मोहित पाटील नगर येथे कंपनीचे मुख्य कार्यालय असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी कार्यालये बंद असून संबंधित संचालक फरार असल्याने गुंतवणूकदारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. बिजनौरमध्ये संतप्त गुंतवणूकदारांनी एका आरोपीच्या घरावर धडक देत गोंधळ घातल्याची घटना देखील घडली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला पांगवले. स्थानिकांच्या मते, या संपूर्ण घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 400 कोटी रुपयांपर्यंत असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मानखुर्द पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत फसवणूक, विश्वासघात आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास वेगात सुरू केला आहे. आरोपींचा शोध घेणे आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे. या प्रकरणामुळे “झटपट नफा”च्या आमिषाला बळी पडणाऱ्या नागरिकांसाठी हा मोठा धडा ठरत असून, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे अत्यावश्यक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, काही गुंतवणूकदारांनी ₹30 लाख, ₹45 लाख, ₹20 लाख अशा मोठ्या रकमाही गुंतवल्या असल्याचे दस्तऐवजात स्पष्ट होते, ज्यामुळे हा घोटाळा अत्यंत मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येते. दरम्यान, या घोटाळ्यामुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले असून, “जलद नफा”च्या आमिषाला बळी पडू नये, असा इशारा पोलिसांकडून देण्यात येत आहे. तसेच, आरोपींना अटक करून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.














Leave a Reply