मुंबई : महाराष्ट्र शासन च्या गृह विभागाने राज्यात गोवंश संरक्षण, अवैध वाहतूक रोखणे आणि संबंधित कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 21 मे 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन परिपत्रकात विविध विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शासनाने भारतीय संविधानातील अनुच्छेद 48 चा उल्लेख करत गोवंशाचे जतन व संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. तसेच राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत विद्यमान कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.
परिपत्रकानुसार राज्यातील महानगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील विनापरवाना किंवा अनधिकृत कत्तलखान्यांची तपासणी करून नियमानुसार कारवाई करावी, असे नमूद करण्यात आले आहे.
तसेच, अवैध गोवंश वाहतूक रोखण्यासाठी परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त तपासणी मोहीम राबवावी, संशयित वाहनांची तपासणी करावी आणि आवश्यकतेनुसार कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्याच्या सीमावर्ती भागांमध्ये संयुक्त तपासणी चौक्या स्थापन करण्याचे निर्देशही शासनाने दिले असून, पोलीस, परिवहन विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.
नागरिकांकडून गोवंश वाहतूक किंवा अनधिकृत कत्तलखान्यांविषयी तक्रारी प्राप्त झाल्यास डायल 112 हेल्पलाईनमार्फत संबंधित यंत्रणांनी तत्काळ दखल घ्यावी, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
शासनाने सर्व विभागांना नियमित आढावा घेऊन संबंधित कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असून, राज्यभरात या निर्णयाकडे महत्त्वपूर्ण प्रशासकीय पाऊल म्हणून पाहिले जात आहे.
















Leave a Reply