टिटवाळा : कडक उन्हाच्या तडाख्यात निष्काळजीपणाची मोठी किंमत चुकवावी लागण्याची वेळ टळली. टिटवाळा पूर्वेतील गणेश मंदिर रोडवर असलेल्या डीजी १ च्या मागे अस्लेल्या परिसरात अभिदर्शन होम्स सोसायटीतील फ्लॅट क्रमांक 405 मध्ये गॅलरीत साठवलेल्या भंगाराला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना आज दुपारी सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली.
माहितीनुसार, फ्लॅटच्या गॅलरीत प्लास्टिक कॅन, कचरा आणि इतर ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते. दुपारच्या तीव्र उष्णतेमुळे या वस्तूंमध्ये तापमान वाढून अचानक आग लागली. काही क्षणांतच धूर आणि ज्वाळांनी गॅलरी व्यापली आणि शेजाऱ्यांच्या नजरेस हा प्रकार आला.
घटना लक्षात येताच सोसायटीतील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. कोणतीही भीती न बाळगता त्यांनी पाण्याच्या मदतीने आग आटोक्यात आणली. त्यांच्या धाडस आणि प्रसंगावधानामुळे आग इतर फ्लॅट्सपर्यंत पसरण्यापासून थांबली आणि मोठा अनर्थ टळला.
या आगीत गॅलरीतील सर्व भंगार जळून खाक झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे सोसायटीत चिंता व्यक्त केली जात आहे. गॅलरीत अशा प्रकारे ज्वलनशील वस्तू साठवण्याचा धोका पुन्हा एकदा समोर आला आहे.
स्थानिक पातळीवर नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, उन्हाळ्यात विशेषतः प्लास्टिक, कचरा किंवा ज्वलनशील वस्तू घराच्या बाहेरील भागात साठवू नयेत. थोडीशी दुर्लक्षदेखील मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकते, याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.














Leave a Reply