JCB च्या निष्काळजीपणामुळे २२ केव्ही लाईन ठप्प; टिटवाळ्यात वीज व पाणीपुरवठ्याचा दुहेरी फटका

 

टिटवाळा : टिटवाळा परिसरातील बल्याणी गावात सुरू असलेल्या गटार सफाईच्या कामादरम्यान गंभीर निष्काळजीपणामुळे मोठा बिघाड घडला आहे. JCB मशीनद्वारे खोदकाम करताना थेट २२ केव्ही उच्चदाब विजवाहिनीची केबल तुटल्याने दुपारपासून अनेक भागांतील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. याचवेळी केडीएमसीच्या पाण्याच्या मुख्य पाइपलाइनलाही तडा गेल्याने नागरिकांवर दुहेरी संकट कोसळले आहे.

या घटनेचा परिणाम रवींद्र आर्केड, रवींद्र रेजन्सी, इंदिरानगर, बल्याणी गाव, मोहिली, टेकडी परिसर, तलाव परिसर, गणेश नगर सोसायटी, आंबेडकर चौक तसेच आंबिवली रोड परिसरावर झाला असून संपूर्ण भाग अंधारात बुडाला आहे. अचानक वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

महावितरणच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले असले तरी उच्चदाब २२ केव्ही लाईनची दुरुस्ती ही जटिल प्रक्रिया असल्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्यास वेळ लागणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठीही काही कालावधी लागू शकतो.

दरम्यान, अशा प्रकारच्या कामांमध्ये सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे वारंवार नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची नाराजी स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे. संबंधित कंत्राटदार व यंत्रणांवर जबाबदारी निश्चित करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *