गोवेली-आनखर रोडवर भीषण अपघात भरधाव आयशर टेम्पोची दुचाकीला जोरदार धडक; विठ्ठल हरड यांचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर

टिटवाळा, वार्ताहर : कल्याण तालुक्यातील गोवेली-आनखर रोड आज पुन्हा एकदा रक्ताने माखला. आनखर गावाजवळ दुपारच्या सुमारास भरधाव वेगाने धावणाऱ्या आयशर टेम्पोने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत विठ्ठल हरड यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर परिसरात भीती, संताप आणि हळहळीचे वातावरण पसरले असून बेफाम वाहनचालकांविरोधात नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे चारच्या सुमारास दुचाकीवरून दोघेजण आनखर गावाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी समोरून वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने अचानक दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की दुचाकी काही फूट दूर फेकली गेली. अपघातात विठ्ठल हरड यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता.

अपघातानंतर काही क्षण परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले. मात्र धडक दिल्यानंतर आयशर टेम्पो चालकाने वाहनासह घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलीस आणि टिटवाळा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, गोवेली-आनखर रोडवर वाढत्या वेगवान वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. “या रस्त्यावर वाहनांचा वेग नियंत्रणात आणण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अन्यथा आणखी निरपराध नागरिकांचे बळी जातील,” अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या भीषण अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *