रायतेच्या ११ बळींनंतर अखेर प्रशासनाला जाग

ॲड. जितेंद्र जोशी यांच्या पाठपुराव्याने ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू

टिटवाळा : कल्याण–मुरबाड मार्गावरील रायते येथील भीषण अपघाताने ११ निष्पाप जीवांचा बळी घेतल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली असून, ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यान्वित करण्यात आली आहे. वाहतूक नियंत्रणाच्या अभावामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे आता नागरिकांमध्ये काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला जात आहे. या निर्णयामागे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष ॲड. जितेंद्र जोशी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची मोठी भूमिका असल्याचे बोलले जात आहे.

रायते दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली होती. कल्याण–मुरबाड मार्गावर सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक, भरधाव वेगाने धावणारी वाहने, नियमांचे खुलेआम उल्लंघन आणि वाहतूक नियंत्रणाचा पूर्ण अभाव यामुळे हा मार्ग अक्षरशः मृत्यूचा महामार्ग बनत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. अपघातातील भयावह दृश्यांनी अनेकांना हादरवून सोडले होते. प्रवाशांनी भरलेल्या इको गाडीचा चक्काचूर, घटनास्थळी पडलेले मृतदेह आणि नातेवाईकांचा आक्रोश यामुळे संपूर्ण जिल्हा शोकमग्न झाला होता.

विशेषतः इको, सुमो, बोलेरोसारख्या खासगी वाहनांमधून सुरू असलेली अवैध प्रवासी वाहतूक आता थेट जीवघेणी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून सातत्याने केला जात आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन धावणाऱ्या वाहनांवर प्रभावी कारवाई होत नसल्याने निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याची भावना अधिक तीव्र झाली आहे. काही ठिकाणी या अवैध वाहतुकीला संरक्षण मिळत असल्याच्या चर्चांमुळेही संताप वाढला होता.

याच पार्श्वभूमीवर ॲड. जितेंद्र जोशी यांनी वाहतूक व्यवस्थेच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत गृह राज्यमंत्री योगेश कदम, पोलीस महासंचालक, तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. डी. स्वामी, विभागीय पोलीस अधीक्षक अनिल लाड तसेच अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. टिटवाळा परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, रेल्वे स्थानक परिसरातील गोंधळ, वाढलेली लोकसंख्या आणि प्रसिद्ध मंदिरामुळे वाढणारी भाविकांची संख्या लक्षात घेता स्वतंत्र वाहतूक यंत्रणा अत्यावश्यक असल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.

या मागणीची गंभीर दखल घेत अखेर ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये स्वतंत्र वाहतूक शाखा सुरू करण्यात आली आहे. भिवंडी, कल्याण, पडघा, शहापूर, कसारा, मुरबाड, वाशिंद, किन्हवली, टोकावडे, गणेशपुरी आदी भागांमध्ये वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र पोलीस अंमलदारांची नियुक्ती करण्यात आली असून इंटरसेप्टर वाहनांसाठीही स्वतंत्र मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे आता वेगमर्यादेवर नियंत्रण, अनधिकृत पार्किंगवर कारवाई, वाहतूक शिस्तीची अंमलबजावणी आणि अवैध प्रवासी वाहतुकीवर अंकुश ठेवण्यासाठी अधिक प्रभावी यंत्रणा कार्यरत होणार आहे.

मात्र नागरिकांच्या मते, केवळ शाखा सुरू करून प्रश्न संपणार नाहीत. रस्त्यावर कठोर अंमलबजावणी, सातत्यपूर्ण कारवाई आणि भ्रष्ट प्रवृत्तींवर निर्भीड लगाम लावला गेला तरच रायतेसारख्या हृदयद्रावक दुर्घटना थांबू शकतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *