गुणवत्ता, प्रेरणा आणि सामाजिक सलोख्याचा दीपस्तंभ ठरणारा ‘झेंडावंदन भादाणे पॅटर्न’ – शिक्षण क्षेत्रात राज्यासाठी दिशादर्शक प्रयोग

Whatsapp image 2026 01 25 at 5.32.26 pm (1)

ठाणे  : संदीप शेंडगे 

ठाणे जिल्ह्यातील भादाणे गावाने शिक्षण क्षेत्रात एक अनोखा, क्रांतिकारी आणि प्रेरणादायी प्रयोग करून केवळ जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘झेंडावंदन भादाणे पॅटर्न’ म्हणून ओळखला जाणारा हा उपक्रम आज गुणवत्ता वाढ, सकारात्मक स्पर्धा, सामाजिक सलोखा आणि शैक्षणिक प्रेरणा यांचे उत्कृष्ट उदाहरण ठरत असून, तो राज्यासाठी दिशादर्शक ठरतो आहे.

या उपक्रमाची ऐतिहासिक सुरुवात १५ ऑगस्ट २०१५ रोजी तत्कालीन सरपंच तथा शाळा शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. श्री. संजय हांडोरे पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णयातून झाली. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा मान गावातील राजकीय वर्चस्व, वाद-विवाद किंवा सत्तासंघर्षावर न ठेवता इयत्ता दहावी व बारावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या आई-वडिलांसह देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हा निर्णय केवळ एक औपचारिक बदल नव्हता, तर तो संपूर्ण गावाच्या सामाजिक व शैक्षणिक संस्कृतीला नवी दिशा देणारा ठरला.

या निर्णयाचे परिणाम अतिशय सकारात्मक आणि दूरगामी ठरले. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासाठी प्रेरणा निर्माण झाली, गुणवत्तावाढीस चालना मिळाली, शाळांमध्ये सकारात्मक स्पर्धेचे वातावरण तयार झाले आणि “पहिला क्रमांक” ही संकल्पना केवळ गुणांची नव्हे तर कष्ट, सातत्य आणि शिस्तीची ओळख बनली. त्याचवेळी गावातील ध्वजारोहणावरून होणारे राजकीय वाद, मतभेद आणि तणाव पूर्णतः थांबले. ध्वजारोहणाचा क्षण सत्तेचा नव्हे तर शिक्षणाचा उत्सव ठरू लागला. त्यामुळे गावात एकोपा, सलोखा, प्रेरणा आणि सकारात्मक सामाजिक वातावरण निर्माण झाले.

या अभिनव उपक्रमाचे कौतुक गावापुरते मर्यादित राहिले नाही. डिसेंबर २०२३ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या पॅटर्नचे विशेष कौतुक करण्यात आले आणि संपूर्ण राज्यात हा पॅटर्न लागू करण्यासाठी सर्वसंमतीने ठराव मंजूर करून तो तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविण्यात आला. इतकेच नव्हे तर या उपक्रमाची दखल देशपातळीवरही घेण्यात आली. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी लखनौ येथे उत्तर प्रदेशचे शिक्षण मंत्री मा. श्री. आशिष पटेल यांनी श्री. संजय हांडोरे पाटील यांचा विशेष सत्कार करून ‘झेंडावंदन भादाणे पॅटर्न’चे देशभर कौतुक केले, ही बाब भादाणे गावासाठी अभिमानास्पद ठरली.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनीही या परंपरेला सन्मानाने पुढे नेण्यात आले. कुमारी संचिता राजेंद्र यशवंतराव हिने बारावी सायन्स परीक्षेत ७७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा मान तिला तिच्या आई-वडिलांसह मिळाला. हा क्षण केवळ एका विद्यार्थिनीचा सन्मान नव्हता, तर तो संपूर्ण गावासाठी शिक्षणाच्या विजयाचा, कष्टाच्या गौरवाचा आणि मूल्याधिष्ठित परंपरेचा उत्सव ठरला.

आज ‘झेंडावंदन भादाणे पॅटर्न’ हा उपक्रम शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता, प्रेरणा, सामाजिक सलोखा आणि मूल्यसंवर्धन यांचा आदर्श नमुना बनला आहे. हा उपक्रम केवळ एक गावापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण महाराष्ट्रासाठी मार्गदर्शक ठरत असून भविष्यातील शैक्षणिक धोरणांसाठीही तो एक प्रेरणादायी मॉडेल ठरू शकतो. शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवता येते, हे भादाणे गावाने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *