मांडा–टिटवाळा परिसरातील नागरी समस्यांवर महापौरांशी चर्चा; तातडीच्या उपाययोजनांचे आश्वासन

Whatsapp image 2026 02 12 at 6.38.21 pm

टिटवाळा, वार्ताहर : मांडा–टिटवाळा परिसरातील विविध नागरी समस्यांबाबत कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर हर्षाली थविल (चौधरी) यांची गुरुवारी (दि. १२) त्यांच्या कार्यालयात शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. परिसरातील मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मांडत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. या भेटीप्रसंगी विशेष कार्यकारी अधिकारी दिलीप राठोड, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲड. अविनाश शिळकंदे, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब घोडके तसेच निवृत्ती दराडे उपस्थित होते. शिष्टमंडळाने मांडा–टिटवाळा परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे महापौरांचे लक्ष वेधले. विशेषतः पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, नालेसफाई, ड्रेनेज व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता, पथदिवे, वाहतूक कोंडी तसेच अन्य नागरी सोयी-सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.

शिष्टमंडळाच्या वतीने संबंधित समस्यांबाबतचे लेखी निवेदन महापौर सौ. हर्षालीताई थविल (चौधरी) यांना सादर करण्यात आले. निवेदनातील मुद्दे काळजीपूर्वक ऐकून घेत नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सकारात्मक व तातडीची कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिले. तसेच संबंधित विभागप्रमुखांशी समन्वय साधून आवश्यक उपाययोजना लवकरात लवकर राबविण्याचे निर्देश देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापौरांच्या संवेदनशील भूमिकेमुळे व सकारात्मक प्रतिसादामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. मांडा–टिटवाळा परिसराच्या विकासासाठी ही भेट महत्त्वाची ठरेल, असा विश्वास शिष्टमंडळातील मान्यवरांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *