नरेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदाला अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवीप्रदान सोहळा संपन्न
कल्याण, दि. १८ एप्रिल :
जगभरात अनेक ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असली, तरी भारत आज सुरक्षित, सक्षम आणि प्रगत राष्ट्र म्हणून उभा आहे. भारतीय तरुणांच्या कौशल्य, बुद्धिमत्ता आणि मेहनतीमुळे आज संपूर्ण जग भारताकडे आदराने पाहत असल्याचे गौरवोद्गार भाजप नेते तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केले. कल्याण-मुरबाड महामार्गावरील इंदाला अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित पदवीप्रदान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी नरेंद्र पवार यांनी पदवीधर विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची जागतिक प्रतिमा मोठ्या प्रमाणात उंचावली असून, पूर्वीचा नकारात्मक दृष्टिकोन आता सकारात्मकतेत बदलला आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना जगभरात मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत.
तुम्ही मिळवलेल्या पदवीचा लाभ भविष्यात देश-विदेशात निश्चित होईल. मात्र कुठेही गेलात, कितीही मोठे झालात तरी मातृभूमी आणि संस्कार विसरू नका, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी केले. यावेळी त्यांनी मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा उल्लेख करत महाराष्ट्रात जन्म घेणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या भूमीत आपण जन्मलो, ही आपली भाग्याची गोष्ट असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
स्वतःच्या जीवनप्रवासाचा उल्लेख करताना नरेंद्र पवार म्हणाले की, “मीही सिव्हिल इंजिनिअर आहे. माझे वडील कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत कामगार म्हणून कार्यरत होते. त्यांच्या वरिष्ठ पदावर अभियंते कार्यरत असत. आपल्या मुलानेही एक दिवस अभियंता बनून मोठे व्हावे, अशी इच्छा होती. त्याच स्वप्नातून माझ्या आयुष्याला दिशा मिळाली.” राजकारणातील प्रवेशामुळे शासकीय सेवेत रुजू होता आले नाही, मात्र नगरसेवक, उपमहापौर आणि आमदार अशा विविध जबाबदाऱ्या सक्षमपणे सांभाळण्याची संधी मिळाल्याचे ते म्हणाले.
तर विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या पालकांचे, शिक्षकांचे आणि स्वतःच्या मेहनतीचे मोठे योगदान असल्याचे सांगत इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करणे ही सोपी गोष्ट नसून सातत्य, जिद्द आणि परिश्रम यांच्या बळावरच हे यश संपादन करता येते, असे प्रेरणादायी मार्गदर्शन त्यांनी केले. या पदवीप्रदान सोहळ्यास महाविद्यालयाचे पदाधिकारी, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








Leave a Reply