आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांची बहार; डोळखांब आश्रम शाळेत कला मेळावा उत्साहात

शहापूर / चंद्रकांत देसले :

आदिवासी विकास विभागाच्या शहापूर प्रकल्पांतर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, डोळखांब येथे विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने “प्रकल्प अभिव्यक्ती” अंतर्गत कला मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला. कला मेळाव्यात आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर चित्रांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. हवामान बदल, पर्यावरण संवर्धन आणि निसर्गरक्षण यांसारख्या विषयांवर काढलेल्या चित्रांमधून विद्यार्थ्यांनी समाजाला जागरूकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. तसेच मातीपासून तयार केलेले विविध मुखवटे आणि आकर्षक कलाकृती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.

याशिवाय विद्यार्थ्यांनी कागदापासून कंदील, तोरण, फुले तसेच फ्लॉवरपॉट तयार करून त्यावर वारली चित्रकलेचे नयनरम्य नमुने साकारले. सुंदर रांगोळी आणि प्रभावी फलक लेखनामुळे संपूर्ण कला मेळावा अधिक रंगतदार आणि आकर्षक ठरला. कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता घाटे यांनी केले. साकुर्ली गावचे पोलीस पाटील जगदीश भोईर यांच्या हस्ते कला मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

या कला मेळाव्यासाठी शाळेचे कला शिक्षक राहुल सांबरे यांनी विशेष मेहनत घेतली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची कलात्मक प्रतिभा खुलून आली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कला मेळावा आनंदी वातावरणात यशस्वीपणे पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *