स्थितप्रज्ञ
तो उभा आहे
स्थिर, स्थितप्रज्ञ
ऊन वारा सोसत
आले तसे अनेक
ऊन पावसाळे
तो अढळ आहे
अनेक आले
तसेच गेले
क्षणाचे सोबती
माहीत आहे त्याला
एक निर्विवाद
पण अटळ सत्य
म्हणून तो
बदलतोय स्वतःला
अस्तित्व टिकविण्यासाठी
आणि म्हणतोय
मोडेन कदाचित पण
स्वत्व सोडणार नाही
कवी विभास/
कैलास विमल भाऊलाल बडगुजर
टिटवाळा.
भ्रमणध्वनी : 8888284265
कवितेवरील समीक्षण
अतिशय उत्कृष्ट आशयाची ही कविता ‘स्थितप्रज्ञ’.
‘स्थितप्रज्ञ’ म्हणजे जो व्यक्ती परिस्थिती बदलल्या तरी मनाने स्थिर, शांत आणि धैर्यवान राहतो. एक तत्त्वनिष्ठ माणूस समाजामध्ये स्वतःच्या तत्त्वांशी तडजोड न करता जगु पाहतो. ऊन, वारा, पाऊस म्हणजेच अनेक संकटे, अडचणी, बाधा यांच्यावर मात करत अढळ उभा राहतो, त्याचे स्वतःचे स्थान ढळू देत नाही, त्याच्या या तत्त्वनिष्ठतेमुळे कित्येक माणसे त्याच्या आयुष्यात आली आणि गेली परंतु त्याने कधीही तत्त्वांना मुरड घातली नाही. लोकांच्या अशा वागणुकीतून त्याला एक निर्विवाद आणि अटळ असे सत्य समजले की हे जग त्याला बदलू पाहत आहे त्याच्या मूल्यांशी त्याला तडजोड करायला सांगत आहे. त्याला याच समाजासोबत आपल्या माणसांसोबत राहायचे आहे म्हणून ‘स्थितप्रज्ञ’ व्यक्तिमत्व असूनही तो बदलण्याचा विचार करत आहे, त्याच्या मूल्यांशी तडजोड करण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याला तत्वांसोबत स्वतःचे अस्तित्व सुद्धा टिकवायचे आहे आणि समाजातील काही कंटक प्रस्थापित व्यक्तिमत्व त्याच्या अस्तित्वाची राख रांगोळी करण्याच्या विचारात आहेत. कितीही बदलण्याचा प्रयत्न केला तरीही त्याला स्वतःच्या तत्वांशी म्हणजेच मूल्यांची तडजोड करता येत नाहीये, त्यामुळे या जाणिवेने त्याच्यातील स्थितप्रज्ञ जागृत होतो आणि निक्षून समाजाला सांगतो की तुमच्या या विकृत मानसिकतेला बळी पडून स्वमूल्यंशी तडजोड करून मला अस्तित्व टिकवायचे नाही. म्हणून मी मोडेन परंतु स्वतत्त्वांशी तडजोड करणार नाही स्वत्व सोडणार नाही.
अतिशय समर्पक ‘स्थितप्रज्ञ’ शीर्षक असलेली ही कविता प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात येणाऱ्या संकटांशी झुंजताना स्वतःची निष्ठा कशी राखावी याची दखल घेण्यास भाग पाडते. संघर्ष, अडचणी आणि बाधा यांसाठी वापरली गेलेली रूपके कवितेला धार देतात समाजाने आणि आप्तस्वकीय यांच्या मानसिकतेनुसार बदल स्वीकारायला तयार असणारा हा कवितेचा नायक स्वतःची ओळख मूल्ये आणि स्वाभिमान कायम राखण्याचा निर्धार करतो.
कवितेची भाषा साधी-सोपी मनाला भिडणारी आणि कमी शब्दात मोठा अनुभव सांगणारी आहे.
‘स्थितप्रज्ञ’ ही कविता आशययुक्त आहे.
संकटात अढळ राहणे आणि बदलत्या काळाबरोबर स्वतःच्या मूल्यांशी, तत्त्वांची जपणूक करणे हा संदेश अधोरेखित करते.
माझ्याकडून कवी विभास यांना खूप शुभेच्छा!
अशाच चांगल्या धाटणीच्या कविता त्यांच्या लेखणीतून कागदावर उतरू दे.
धन्यवाद 🙏
सुचिता बागडे-खाडे
कवयित्री/लेखिका/व्याख्याती/शिक्षिका






Leave a Reply